८ महिन्यांत ३४ जणांचा मृत्यू; गेल्या वर्षीच्या तुलनेत मात्र घट

पूनम सकपाळ, लोकसत्ता

नवी मुंबई : गेल्या आठ महिन्यांत ट्रान्स हार्बर या रेल्वे मार्गावर ३४ जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात १११ जणांचा मृत्यू झाला होता. टाळेबंदीत रेल्वे गाडय़ा कमी प्रमाणात सुरू असतानाही अपघात झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.

वाशी रेल्वे स्थानक हे नवी मुंबई शहराचे महत्त्वाचे व मध्यवर्ती ठिकाण आहे. येथून नवी मुंबई मुंबई तसेच उपनगरांना जोडली गेली आहे. वाशी रेल्वे पोलीस यांचे कार्यक्षेत्र गोवंडी ते सीवूड तसेच वाशी ते रबाळे हा रेल्वे मार्ग आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सन २०१९ मध्ये मार्च ते ऑक्टोबर दरम्यान रेल्वे अपघातात १११ जणांचा मृत्यू झाला होता.  या वर्षी करोना संसर्गामुळे याच काळात टाळेबंदी होती. त्यामुळे रेल्वे वाहतूक बंद होते. अत्यावश्यक सेवेसाठी आगदी मोजक्याच गाडय़ा सोडल्या जात होत्या. असे असतानाही या काळात या मार्गावर अपघात झाले असून ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१७ मध्ये १७२, तर सन २०१८ मध्ये १४८ जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता.

रेल्वे अपघातात मृत्यू

(मार्च ते ऑक्टोबर)

२०१९   २०२०

मार्च          २१        २३

एप्रिल         १२       ०

मे              १२       ०

जून            ९        १

जुलै            १३       ०

ऑगस्ट       १३      ३

सप्टेंबर       १४     ४

ऑक्टोबर    १७     ३

एकूण         १११    ३४

संरक्षक भिंती तोडून रहदारी सुरूच

उपाययोजना केल्या असताना देखील प्रवासी रेल्वे रूळ ओलांडत आहेत.  स्थानकालगत संरक्षक भिंती उभारण्यात आलेल्या आहेत, प्रवाशांनी या भिंतीदेखील तोडून रहदारी सुरूच ठेवली आहे. त्यामुळे अपघात वाढत आहेत. संरक्षक भिंतीने दोन रेल्वे स्थानके जोडली गेली पाहिजेत अशी अपेक्षा रेल्वे पोलीस व्यक्त करीत आहेत.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा टाळेबंदीदरम्यान रेल्वे अपघातात घट झाल्याचे निदर्शनास येत आहे. तरीदेखील रेल्वेने प्रवास करताना प्रत्येकाने जबाबदारीने प्रवास करावा. तसेच अपघातातील बेवारसांचे ओळख न पटल्याने ते एक अडचणीचे ठरत आहे.

एस. एस. पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक, वाशी रेल्वे