नवी मुंबई : अचानक ब्रेक दाबल्याने मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने किरकोळ अपघात झाला. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास नेरुळ उड्डाणपुलावर हा अपघात झाला. अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरच उभी करत दोन वाहनचालकांमध्ये बराच वेळ वाद झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. सुमारे तीन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. शीव-पनवेल महामार्गावर नेरुळे ते सानपाडा दरम्यान ही वाहतूक कोंडी झाली होती.

बुधवारी दुपारी २ च्या सुमारास नेरूळ येथील एलपी उड्डाणपुलावर दोन कारचा धडक झाली. अचानक ब्रेक दाबल्याने मागून येणाऱ्या वाहनाने पुढील वाहनाला धडक दिली. हा अपघात सीबीडीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर झाला. अपघात किरकोळ होता मात्र दोन्ही वाहनमालकांमध्ये यामुळे वाद झाला. हा वाद सुरू असताना अपघातग्रस्त वाहने ही रस्त्यावरच होती. त्यामुळे पुलावरील वाहनांचा मार्ग बंद झाला. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या. हळूहळू ही वाहतूक कोंडी जुईनगरच्या पुढे गेली. काही वेळाने वाहतूक पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी त्या दोघांना ताब्यात घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. मात्र शीळ रस्त्यावरील वाहनांची भर पडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाहतूक विस्कळीत झाली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन गायकवाड यांनी दिली.