नववर्ष स्वागताच्या निमित्ताने पहाटेपर्यंत रंगणाऱ्या मेजवान्या, सोहळे, समारंभ यांतून करोनाचा फैलाव मोठय़ा प्रमाणात होण्याची शक्यता लक्षात घेऊन नवी मुंबई पोलिसांनी ३१ डिसेंबरसाठीचे निर्बंध अधिक कडक केले आहेत. शेतघरे, निर्जन स्थळे, महामार्गावरील रिकाम्या जागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून मद्यप्राशन केल्यास सहप्रवाशावरही कारवाई करण्यात येणार आहे.

संचारबंदी असल्याने रात्री ११ नंतर सर्व हॉटेल्स, बार बंद असणार आहेत. याशिवाय खाद्य पदार्थाची घरपोच सेवाही बंद राहणार आहे. संचारबंदीमुळे नागरिक मोठय़ा प्रमाणावर घराबाहेर पडणार नाहीत असा अंदाज पोलिसांना आहे, तरीही सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यावर्षी मद्यप्राशन करणाऱ्या चालकाबरोबर सहप्रवाशांनाही कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे मद्यप्राशन करून वाहन न चालवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

निर्बंधांमुळे या वर्षी शेतघरे, खासगी जागेवर अमली पदार्थाचे सेवन होऊ  शकते. यामुळे अमली पदार्थ विरोधी पथकाचे विशेष लक्ष असणार आहे. हा प्रकार कुठे होऊ शकतो याची स्थळ पाहणी करीत कारवाईसाठी पोलीस सज्ज आहेत. पनवेल, उरणच्या आसपासचा परिसर, कर्नाळा किल्ला परिसर, सेवा रस्त्यांवर रात्रभर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. याशिवाय शहरातून जाणाऱ््या दोन्ही महामार्गावर नाकेबंदी करण्यात येणार असून कसून तपासणीनंतरच वाहने सोडण्यात येणार आहेत.

सोसायटीत जल्लोषावरही कारवाई

संचारबंदीच्या निर्बंधांमुळे सोसायटी किंवा गच्चीवर येथील लोक एकत्र येत कार्यक्रम आयोजनांचे प्रमाण वाढणार आहे. यात घातलेल्या निर्बंध पायदळी तुडवले जाणार असल्याने नवी मुंबई पोलिसांनी यासाठी खास पथक तयार केले असून ते असे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करणार आहे. त्यामुळे रहिवाशांनीही पोलिसांना हे प्रकार कळवून स्वत: आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी केले आहे.

३० डिसेंबर ते १ जानेवारीदरम्यान नियमित बंदोबस्त असणारच आहे. याशिवाय अंमलीपदार्थ विक्री व सेवन करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी अभिलेखावरील आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे. या वर्षी काळजी घेतली तरच पुढील वर्षी जल्लोषात स्वागत करता येईल.

-बी.जी. शेखर, सहपोलीस आयुक्त