नवी मुंबई : येथील पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या १२४ विदेशी नागरिकांवर पारपत्र विभागाने कारवाई केली आहे. २०१८ ते २०१९ या काळात या परकीय नागरिकांनी घुसखोरी केली असून त्यात ५४ नागरिक आफ्रिका खंडातील, ७० नागरिक बांगलादेशी व उर्वरित विविध आठ देशांतील आहेत.

नवी मुंबईत बेकायदा राहणाऱ्या बांगलादेशी आणि नायझेरियन नागरिकांचा वावर दिसून येतो. खास करून बोनकोडे, कोपरी आणि कोपरखैरणे गावाठाण भागांत त्यांचे प्रमाण जास्त आहे. दुप्पटतिप्पट भाडय़ाच्या लालसेपोटी घरमालकही त्यांना ठेवत होते. दरम्यान, या लोकांकडून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने याच कारणाने विशेष शाखा उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी ठोस कारवाई केली.

यात धरपकड आणि खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून ही कारवाई साहाय्यक पोलीस निरीक्षक सरदार नाळे यांच्या पथकाने केली. पारपत्र विभागाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या नागरिकांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी दिल्ली मुख्यालयाकडे करण्यात आली आहे.

बोनकोडे गावात तर एकाच सदनिकेत ५५ नायझेरियन पुरुष महिलांनी मद्य प्राशन करून परिसरात गोंधळ घातला होता. त्यांना अडवणाऱ्या पोलिसांनाही त्यांनी मारहाण करून पळ काढला होता. या घटनेनंतर या विदेशींना बोनकोडेतही घर भाडय़ाने देणे बंद झाले. त्यामुळे या लोकांनी आता आपला मोर्चा पनवेल, खारघर परिसरांत वळवला आहे. बांगलादेशी नागरिक स्वस्तात मजुरी तर महिला घरकाम करण्याचे प्रमाण जास्त आहे.

नायझेरियन किवा अन्य आफ्रिका खंडातील नागरिक हे ऑनलाइन फसवणूक आणि अमली पदार्थ वितरण करीत असल्याचे अनेकदा सिद्ध झाले होते. पर्यटन, नोकरी व शिक्षणाच्या व्हिसावर येऊन ते देशात शिरकाव करतात. मात्र त्यानंतर ते गैरमार्गाला लागतात.

आयुक्त संजयकुमार यांच्या आदेशानुसार आयुक्तालय क्षेत्रात बेकायदा राहणाऱ्या विदेशी नागरिकांच्या विरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. यात परिमंडळ एक व दोन तसेच गुन्हे शाखा उपायुक्त या सर्वच पोलीस शाखांनी संयुक्तपणे कारवाई केली. यापुढेही ती सुरू राहील. – सुरेश मेंगडे, उपायुक्त, विशेष शाखा