गणेशोत्सवाच्या काळात जुगार खेळणाऱ्या २० जुगाऱ्यांवर खांदेश्वर पोलिसांनी कारवाई केली. खांदेश्वर वसाहतीमधील सेक्टर क्रमांक ९ येथील मार्केटचा राजा या गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाचा आधार घेऊन हे जुगारी तीन पत्त्यांचा जुगार खेळत होते. त्या वेळी पोलिसांनी धाड टाकली आणि या सर्व जुगाऱ्यांना अटक केली. डावातील साडेआठ हजार रुपये आणि या मंडळींच्या खिशामधील सुमारे ३५ हजार अशी एकूण त्रेचाळीस रुपयांची रोकड पोलीस अधिकारी अमर देसाई यांच्या पथकाने जप्त केली.

सेक्टर ९ येथील मार्केटचा राजा मंडळाला येथे राहणारे रहिवाशी व रस्त्यांवर फेरीवाले वर्गणी देऊन हा उत्सव साजरा करतात. या कष्टकऱ्यांच्या गणेशोत्सव मंडपाच्या पाठीमागे बसण्याची व विजेची सोय करून या मंडळींनी येथे आपला अड्डा सुरू केला होता.

जुगार खेळणाऱ्या २० संशयितांना रंगेहाथ पकडल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये अविनाश खुटकर, आसिम खान, रमेश पाटील, संजय भोसले, शिवदास गुडवी, नीलकंठ गोंधळी, संपत श्रुवण, योगेश नेरडकर, विलास चव्हाण, प्रशांत तावडे, वासुदेव भोईर, इक्बाल खान, हनुमंत दंडळेकर, भगत म्हात्रे, भगवान पाटील, रशीद खामकार, सूर्यकांत भिसे, दिलीप धायगुडे, फारूख सय्यद, शुभम पोळ यांचा समावेश आहे. ही सर्व मंडळी खांदेश्वर परिसरातील रहिवासी आहेत. या मंडळींना सकाळी त्यांना जामिनावर सोडण्यात आले.

कार्यकर्त्यांचा ‘टाइमपास’

सहा दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर यंदा पहिल्यांदाच खांदेश्वर पोलिसांनी मोठी कारवाई केल्याने या कारवाईचा धसका खारघर, कामोठे, कळंबोली येथील गणेशोत्सवांत ‘टाइमपास’ करणाऱ्यांनी घेतला आहे.