News Flash

बेकायदा हॉटेलांवर हातोडा

नवी मुंबईत बेकायदा बांधकामांचा भस्मासुर बोकाळला आहे.

   महापालिका क्षेत्रातील सहा हॉटेलांच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात आली. (छायाचित्र : नरेंद्र वास्कर) 

ऐरोली, बेलापूरमध्ये मोकळ्या जागा, पार्किंगच्या जागांवरील अतिक्रमणे जमीनदोस्त

बेकायदा बांधकाम किंवा अतिक्रमण केलेल्या हॉटेलांवर नवी मुंबई महापालिकेने बुधवारी कारवाई सुरू केली. बांधकामाविषयीचे नियम मोडणाऱ्या १२१ हॉटेलांची यादी पालिकेच्या नियोजन विभागाने अतिक्रमणविरोधी पथकाला दिली आहे. त्यापैकी ऐरोली व बेलापूर येथील सहा हॉटेलांवर पालिकेने बुधवारी संध्याकाळी कारवाई केली. येत्या काळात टप्प्याटप्प्याने शहरातील बेकायदा बांधकाम करणाऱ्या सर्व हॉटेलांवर पालिका हातोडा चालवणार आहे. यात वाशीतील काही बडय़ा हॉटेलांचाही समावेश आहे. पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबत कडक भूमिका घेतली आहे.

नवी मुंबईत बेकायदा बांधकामांचा भस्मासुर बोकाळला आहे. त्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयासह शासनानेही चिंता व्यक्त केली आहे. या बेकायदा बांधकामांत शहरातील हॉटेल्स, लॉज, उपाहारगृह यांचे प्रमाण मोठे आहे. मार्जिनल स्पेस व पार्किंगच्या जागेचा व्यवसायासाठी वापर करणे, अंतर्गत बदल करून इमारतींच्या मूळ आराखडय़ात फेरफार करणे, निवासी क्षेत्राचा वाणिज्यिक वापर करणे, दोन सदनिकांमध्ये मोडतोड करून क्षेत्रफळ वाढविणे, टेरेसवर करून बेकायदा बांधकाम करणे असे प्रकार शहरात १२१ हॉटेलांत आढळले आहेत. अशा बांधकामामुळे आपत्कालीन परिस्थितीत इमारतीत अग्निशमन दलाच्या गाडय़ा जाण्यासही जागा शिल्लक राहत नाही. हे सर्व बेकायेदशीर बांधकाम स्थानिक प्रभाग अधिकाऱ्यांच्या अशीर्वादाने सुरू असल्याचा आरोप येथील रहिवासी करतात.

पालिका आयुक्त मुंढे यांनी बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्याचे सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत. दिघा ते बेलापूर या पालिका क्षेत्रातील या बेकायदा बांधकाम व अतिक्रमणांवरील कारवाईला बुधवारपासून पालिकेने कारवाईला सुरुवात केली असून ऐरोली येथील ममता, गरम मसाला, वैभव, प्रियांका, ऑल इन वन आणि घणसोलीतील लक्ष्मी, अशा सहा हॉटेलांवर कारवाई करण्यात आली.

ऐरोलीत बेकायदा बांधकाम करणाऱ्या सोळा हॉटेलना पालिकेने यापूर्वीच नोटीस बजावली आहे. आतापर्यंत १२ हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. रबाळे पोलीस ठाण्याबाहेर असलेल्या लक्ष्मी हॉटेलचे काही महिन्यांपूर्वी नूतनीकरण करण्यात आले. त्या वेळी तिथे अनेक नियमांचे उल्लंघन करण्यात आले. परिसरात कोणत्याही उपाहारगृहाची व्यवस्था नसल्याने या हॉटेलवर पोलिसांनी कृपादृष्टी ठेवली होती, पण पालिकेने त्यावरही कारवाई केली आहे. बेलापूर येथेही दोन हॉटेलवर कारवाई करण्यात आली असून आठवडाभरात सर्व हॉटेलवर कारवाई केली जाणार आहे.

हॉटेलच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याची जबाबदारी प्रभाग अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. वाशी, सानपाडा, तुर्भे, नेरुळ व ऐरोली येथील १४ बडय़ा हॉटेलनी मोठय़ा प्रमाणात केलेल्या बेकायदा बांधकामांच्या विरोधात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यातील तीन हॉटेल व्यवस्थापनांनी प्रथम न्यायालयीन आणि नंतर नगरविकास विभागाची स्थगिती आणली होती. नगरविकास विभागाने दिलेली स्थागिती उठविण्यात यावी, म्हणून पालिकेने दोन वेळा नगरविकास विभागाला स्मरणपत्र दिले आहे. त्यासंर्दभात गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत या हॉटेलवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याचे समजते.

पालिकेच्या नियोजन विभागाने दिलेल्या यादीप्रमाणे अतिक्रमण किंवा अनधिकृत बांधकाम करणाऱ्या हॉटेल्सवरील कारवाईला सुरुवात झाली आहे. वाशी येथील बडय़ा हॉटेल्सवरही लवकरच कारवाई केली जाणार आहे.

डॉ. कैलाश गायकवाड, उपायुक्त, नवी मुंबई पालिका (अतिक्रमण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 1:16 am

Web Title: action against illegal construction in airoli belapur
Next Stories
1 महापालिका आयुक्त सुटी कधी घेणार?
2 पाऊले चालती.. : मैत्रीचा ट्रॅक
3 दोन नवजात अर्भकांसह महिलेची फरफट
Just Now!
X