फेरीवाला सर्वेक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण, विनापरवानाधारक फेरीवाले अधिक, दुसरी फेरीही लवकरच

नवी मुंबईत अनधिकृत फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. पहिल्याच टप्प्यात पालिकेने फेरीवाल्यांना वितरित केलेल्या परवान्यांपेक्षा अधिक फेरीवाले व्यवसाय करत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. पहिल्या फेरीत बेलापूर ते दिघ्यापर्यंत सर्वेक्षण करण्यात आले असून दुसरी फेरीही लवकरच होणार आहे.

नवी मुंबई पालिकेने केवळ २,१३८ फेरीवाल्यांना परवाने दिले होते. मात्र, सर्वेक्षणाच्या पहिल्याच टप्प्यात ३७११ फेरीवाल्यांची नोंद करण्यात आली आहे. फेरीवाला समितीसोबत झालेल्या बैठकीनंतर पालिकेने हे सर्वेक्षण सुरू केले. या प्रत्येक टप्प्यात एकही फेरीवाला सर्वेक्षणातून वगळला जाणार नाही याची खबरदारी पालिकेतर्फे घेण्यात येत आहे. नवी मुंबईतील वाशी, नेरुळ, बेलापूर, कोपरखैरणे, ऐरोली, घणसोली, तुर्भेसह सर्वच विभागातील फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. उच्च न्यायालयाने रेल्वेस्थानकापासून दीडशे मीटपर्यंतच्या हद्दीत फेरीवाल्यांना बसण्यास मनाई करण्याचे आदेश देऊनही नवी मुंबईत अजूनही स्थानकाबाहेर व अगदी रेल्वेस्थानकातही फेरीवाले व्यवसाय करताना दिसतात. स्थानकाबाहेरचा चौक, पदपथ, गर्दीची ठिकाणे येथे पादचाऱ्यांची वाट अडवून वस्तूंची खुलेआम विक्री केली जाते. पहिल्या टप्प्यात बेलापूर, नेरुळ, वाशी या भागांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणही लवकरच सुरू होणार आहे.

पालिकेने नियुक्त केलेल्या खासगी कंपनीकडून हे सर्वेक्षण केले जात आहे. या कामाची मुदत तीन महिने असून कंपनीस प्रत्येक फेरीवाल्यामागे ९० रुपये दिले जाणार आहेत.

खाऊगल्ल्या हद्दपार?

फेरीवाल्यांच्या बायोमेट्रिक सर्वेक्षणानंतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर गंडांतर येणार आहे. केवळ घरून तयार करून आणलेलेच पदार्थ विक्री करण्याची परवानगी असल्याने वडापाव, चायनीजच्या गाडय़ा बंद होण्याची शक्यता आहे. रस्त्यावर पदार्थ तयार करून विक्री करणाऱ्यांना अन्न व भेसळ विभागाची परवानगीच मिळणार नसल्याने शहरातील खाऊगल्ल्या हद्दपार होणार आहेत.

सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर परवाना वितरण

सर्वेक्षणासाठी एक खास अ‍ॅप तयार करण्यात आले असून फेरीवाला सर्वेक्षक फेरीवाल्याचे बसण्याचे ठिकाण अ‍ॅपमध्ये नोंदवतात. त्यानंतर फेरीवाल्याच्या आधार क्रमांकाची नोंद केली जाते. त्यानंतर तयार झालेला ओटीपी क्रमांक आधारशी संलग्न असलेल्या फेरीवाल्याच्या मोबाइलवर येतो. हा ओटीपी क्रमांक सांगितल्यावर फेरीवाल्याचे आधारकार्ड फोटोसह अ‍ॅपमध्ये समाविष्ट होते. त्यानुसार फेरीवाला बसतो त्या जागेचा अक्षांश आणि रेखांशही समाविष्ट होतो आणि सर्वेक्षण पूर्ण होते. दोन फेऱ्यांनंतर फेरीवाल्यांची अधिकाऱ्यांमार्फत चाचणी होणार आहे. त्यात नियमावलीनुसार पात्र असणाऱ्या फेरीवाल्यांना परवाने देण्यात येतील. यासाठी सर्वेक्षण झालेल्या फेरीवाल्यांनी कागदपत्रांची जमवाजमव सुरू केली आहे.

फेरीवाल्यांचे पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षण पूर्ण झाले असले तरी आधारकार्ड नोंदणीबाबत अनेक समस्या येत आहेत. त्या समस्या पालिकेने प्रथम सोडवाव्यात. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण करावे.  -प्रफुल्ल म्हात्रे, अध्यक्ष, नवी मुंबई हॉकर्स युनियन