५०० ब्रास वाळू हस्तगत; ५ वर्षांतील सर्वात मोठी कारवाई

नवी मुंबई वाहतूक विभाग आणि पनवेलचे तहसीलदार यांनी शुक्रवारी पहाटे पावणेपाच वाजता तळोजा गाव येथे वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ३४ ट्रकवर कारवाई केली. जप्त करण्यात आलेल्या ५०० ब्रास वाळूची किंमत सहा कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. पनवेलमध्ये अवैध वाळू वाहतुकीवर गेल्या पाच वर्षांत झालेल्या कारवायांतील ही सर्वात मोठी कारवाई ठरली.

नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त नितीन पवार यांना वाळू तस्करीची माहिती मिळाली. त्यांनी पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे यांच्यासह गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजता नवी मुंबई पोलीस मुख्यालयातील नवीन भरती झालेल्या ४० शिपायांना अचानक बोलावले.

स्थानिक पोलिसांना मागमूस लागू नये याची दक्षता घेतली. तळोजा गावाबाहेरील खारघर नोडला जोडणाऱ्या रस्त्यावर अवैध वाळूने भरलेले ट्रक पोलीस व तहसीलदार यांच्या उपस्थितीत जप्त करण्यात आले. त्यामुळे महसूल विभाग व स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांचीही झोप उडाली आहे. दोन वर्षांपूर्वी सहायक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी वाळूचे १२ ट्रक पकडले होते.

ट्रकमालकांनी नेहमीप्रमाणे कल्याण तहसीलदारांची लिलावातील वाळूची नेत असल्याची पावती पोलिसांना दाखविली, मात्र या पावतीवर सूर्यास्तानंतर व सूर्योदयापूर्वी वाळूच्या वाहतुकीवर बंदी असल्याचे नमूद करण्यात आले होते. असे असताना ट्रकमालकांना पावती दिलीच कशी, असा प्रश्न तपास अधिकाऱ्यांनी उपस्थित केला.

या प्रकरणाची पाळेमुळे कल्याण येथील महसूल विभागात काम करणाऱ्या खासगी व्यक्तींपर्यंत पोहोचलेली असल्याचा संशय व्यक्त होत आहे.  या प्रकरणी पोलीस शौकत नावाच्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

वाळू-तस्करांचे गाव

खारघर परिसरातील तळोजा येथील ग्रामस्थांचा पूर्वीपासून वाळू-वाहतुकीचा व्यवसाय आहे. हे ग्रामस्थच पुढे ट्रकमालक झाले. वाळूउपशावर बंदी आणल्यानंतर अनेकांनी वाहतुकीचे बनावट पास मिळवून वाघिवली, गणेशपुरी, मुंब्रा येथून अवैध वाळूची ने-आण करण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यामुळे तळोजा गाव वाळू-तस्करांचे गाव म्हणून ओळखले जाऊ लागले. खारघर व तळोजा नोडमधील मोठे बांधकाम प्रकल्प या तस्करांसाठी कुरण ठरले. महसूल व पोलिसांना हाताशी धरून ते गेली अनेक वर्षे हा अवैध व्यवसाय करत आहेत.