नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांविरोधात राबविलेल्या विशेष मोहिमेंतर्गत मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या ३९६ तळीरामांवर गुन्हे दाखल केले . यामध्ये ३१ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंतच्या पहाटे ५ वाजेपर्यंत कारवाईचा समावेश असून प्रत्येक तळीरामाला संबंधित पोलीस ठाण्यात नेण्यात येऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. वाहतूक विभागाच्या २८८ कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कारवाईमुळे होणारे अनेक अपघात गुरुवारी रात्री टळले.
या कारवाईमुळे पोलीस दलाच्या तिजोरीत सुमारे आठ लाख रुपयांची अनामत रक्कम झाली आहे. नवी मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेसाठी स्वतंत्र पोलीस उपायुक्त हे पद निर्माण केले आहे. उपायुक्त अरविंद साळवे यांच्याकडे ही जबाबदारी आहे. साळवे यांच्या पथकाने ही कारवाई केली. २०१५ या संपूर्ण वर्षांत सुमारे २ हजार तळीरामांना वाहन चालविताना पकडले आहे. गेल्या वर्षी याच रात्री हाआकडा ३२२ एवढा होता. त्यामुळे २०१५च्या आकडेवारीनुसार तळीरामांची संख्या वाढल्याचे पोलीस दफ्तरी नोंद झाली आहे. गुरुवारी रात्री सर्वाधिक मद्यपी वाहनचालक कळंबोली सर्कल येथे पकडले गेले.