प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि नवी मुंबई मनपाने संयुक्त कारवाई करीत प्लास्टिक वापरणाऱ्या सात दुकानांवर कारवाई करीत प्रत्येकी पाच हजार अशी ३५ हजारांची दंड वसुली करण्यात आली. याचबरोबर प्लास्टिक कप बनवणारा कारखाना आणि दूषित पाणी सोडणाऱ्या बांधकाम प्रकल्पाला सील ठोकण्यात आले.

प्लास्टिकविरोधी कारवाई करण्याचे सत्र नवी मुंबईत सुरू असून शुक्रवारी घणसोली येथे धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये मोहिनी एंटरप्रायझेस, बिकानेर स्वीट्स, पेरीज् नॉवेल्टी, हॉटेल काशी कैलास, कोहिनूर स्वीट्स त्याचप्रमाणे सेक्टर २५ येथील जे. के. एंटरप्रायझेस व तळवली गाव येथील बिकानेर स्वीट्स या सात दुकानांवर कारवाई करून प्रत्येकी पाच हजारप्रमाणे ३५ हजार इतका दंड वसूल करण्यात आला.

त्याचप्रमाणे सेक्टर २५, नमो प्रोझन फूड या ठिकाणी दूध पावडर व तेल यांचे एकत्रित मिश्रण करून पनीर भेसळ तयार करण्याचे काम सुरू  असल्याचे निदर्शनास आल्याने याबाबत अन्न व औषध प्रशासनास तातडीने माहिती देण्यात येऊन रबाळे पोलीस स्टेशन यांनाही याबाबत माहिती देण्यात आली. घणसोली सेक्टर २५ येथील जे. के. एंटरप्रायझेस या कारखान्यात प्लास्टिक कप बनविण्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले.

मनपा आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सेक्टर ११ घणसोली येथील  आर. एन. ए. बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स यांच्या प्लांटचे  दूषित पाणी रस्त्यावर सोडून दिले जात असल्याचे निदर्शनास आले. या गाळमिश्रित पाण्याने रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता पाहता सदर प्लॉटचा मुख्य दरवाजा सील करून कारवाई करण्यात आली.

इनऑरबिट मॉलमध्ये ५० किलो प्लास्टिक जप्त

महाराष्ट्र प्रदूषण मंडळातर्फे प्लास्टिक विरोधी कारवाईचा विशेष बडगा उगारला आहे. या कारवाईत शहरातील दुकाने, मॉल, व्यापारी यांच्यावर छापा टाकून प्लास्टिक जप्तीची कारवाई केली जात आहे. वाशीतील इनऑरबिट मॉलवर छापा टाकून ५० किलो प्लास्टिक जप्त केले आहे. यामध्ये छोटय़ा-मोठय़ा प्लास्टिक पिशव्या, वन टाइम प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक स्ट्रॉ जप्त करण्यात आले असून ४० हजार रुपये दंड वसुली करण्यात आला आहे.