‘सतरा प्लाझा’ परिसरातील दुकानांच्या अतिक्रमणांवर कारवाई, बेकायदा पार्किंगलाही वेसण

नवी मुंबई महापालिका आणि वाहतूक विभाग यांना वाकुल्या दाखवत पामबीच मार्गावर सतरा प्लाझासमोर करण्यात येणाऱ्या बेकायदा वॅलेट पार्किंगवर आणि परिसरातील अन्य अतिक्रमणांवर शुक्रवारी जोरदार कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या वाशी, तुर्भे, कोपरखैरणे विभाग कार्यालयांनी व वाहतूक विभागाने एकत्रितपणे हा बडगा उगारला. पुढील आठवडाभर सातत्याने कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त रामास्वामी एन. सांगितले. पामबीचवर खुलेआम होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी ‘लोकसत्ता महामुंबई’मधून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता.

सतरा प्लाझा परिसरातील बेकायदा वॅलेट पार्किंगवर आणि वाहनदुरुस्तीच्या दुकानांवर कारवाई करण्याचे आदेश ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक वाहतूक शाखा व प्रादेशिक परिवहन विभागाला काही दिवसांपूर्वी दिले होते. त्यानंतर पालिका आणि संबंधित विभाग खडबडून जागे झाले. या संदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक झाल्यानंतर शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. आजवर केवळ नोटिसा बजावणाऱ्या पालिकेने शुक्रवारी दिवसभर अतिक्रमणांवर तोडक कारवाई केली. परिसरात पार्क करण्यात आलेल्या वाहनांना जॅमर लावण्यात आले. त्यामुळे वाहनचालक आणि पोलिसांत वादविवादही झाले. दुकानांबाहेरील सामान आणि वॅलेट पार्किंगचे फलक जप्त करण्यात आले. पालिकेने पदपथांवर खड्डे खोदून नो पार्किंगचे फलकही तात्काळ लावले.

अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अमरिश पटनिगिरे, वाशी विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके, कोपरखैरणेचे विभाग अधिकारी अशोक मढवी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. पालिकेने येथील बेकायदा व्यवसायिकांना २०१४मध्ये नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर आतापर्यंत पालिकेने ठोस पावले उचलली नव्हती. त्यामुळे येथील व्यावसायिकांचे चांगलेच फावले होते. पालिकेने एकूण ५२ दुकानांना नोटिसा बजावल्या आहेत. १५ व्यावसायिकांनी कोर्टाची स्थगिती मिळवली आहे. तर शुक्रवारी १३ दुकाने पालिकेने सील केली आहेत. वाशी पोलीस ठाण्यातील मंदिरावरही पालिकेने तोडक कारवाई केल्याचे वाशी विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके यांनी सांगितले.

कोपरी गाव ते या मार्गावरील एमएसईबी चौकापर्यंतच्या दोन लेन बेकायदा वाहनांनी अडवून ठेवल्यामुळे इथे वारंवार अपघात होत. वाहनांची खरेदी-विक्री करणाऱ्या दुकानांनीही काही भाग अडवून ठेवला होता. सतरा प्लाझामध्ये असलेल्या विविध गाडय़ांच्या शोरुम, हॉटेल, ज्वेलर्स दुकाने, कार्यालयांमध्ये गेलेल्यांची वाहने जॅमर लावून ठेवण्यात आली. अनेक दुचाकी वाहतूक विभागाने टोइंग व्हॅनद्वारे उचलून नेल्या. शुक्रवारी सायंकाळपर्यंत वाहनचालकांकडून ८५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अधिकारी, कर्मचारी मिळून ४०-५० जण उपस्थित होते. चार टोइंग वाहने, दोन जेसीबी, तीन ट्रक असा फौजफाटा कारवाई करत होता. पालिकेने ही अतिक्रमणे हटवल्यामुळे पामबीच मार्गाने मोकळा श्वास घेतला आहे.

पामबीचवर बेकायदा पार्क केलेल्या सुमारे ८६ वाहनांना जॅमर लावण्यात आला. व्यावसायिकांचे अतिक्रमण हटविण्यात आले. अनेक दुकाने सील करण्यात आली. सलग आठ दिवस कारवाई करण्यात येणार आहे. संरक्षक भिंतीबाबत नियोजन करण्यात येत आहे. कोंडी हटविण्यासाठी कायमस्वरूपी उपाय करण्यात येणार आहे.

रामास्वामी एन., आयुक्त, नवी मुंबई महापालिका

आम्ही १७ वर्षांपूर्वी येथे दुकान खरेदी केले होते. तेव्हापासून या परिसरात वाहनांचे सुटे भाग विकत आहोत. आता पालिकेने कारवाई केली. आम्ही काय करायचे? पालिकेने दुकानामोर भिंत बांधली तर आमचा व्यवसाय बंद होणार आहे.

राज चोप्रा, व्यवसायिक

बेकायदा पार्किंगबाबत व अयोग्य दिशेने काढलेल्या प्रवेशद्वाराबाबत पालिकेने नोटिसा बजावल्या होत्या. आज कारवाई करण्यात आली. जॅमर लावून अनेक चालकांकडून प्रत्येकी ६,१०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाहतूक विभाग २०० रुपये दंड ठोठावतो. पालिकेला दंड ठोठावून गाडी उचलून कचराभूमीवर ठेवण्याचे अधिकार आहेत.

मच्छिंद्र खाडे, वरिष्ठ वाहतूक निरिक्षक, एपीएमसी