News Flash

लवादाच्या निर्णयाविरोधात पालिका उच्च न्यायालयात

नवी मुंबई महापालिकेने गेल्या वर्षी शहरातील उद्यानांच्या देखभालीसाठी सर्वसमावेशक ठेका पद्धत राबवत हे काम दोन ठेकेदारांना दिले होते.

 

नवी मुंबई : उद्यान घोटाळा प्रकरणी पालिका प्रशासनाने ठेकेदारांवर केलेली कारवाई चुकीची असल्याचा निर्णय लवादाने नुकताच दिला असून त्याला पालिका प्रशासनाने सोमवारी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तर याप्रकरणी तक्रारदार असलेल्या आमदार मंदा म्हात्रे यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

नवी मुंबई महापालिकेने गेल्या वर्षी शहरातील उद्यानांच्या देखभालीसाठी सर्वसमावेशक ठेका पद्धत राबवत हे काम दोन ठेकेदारांना दिले होते. मात्र टाळेबंदीच्या काळात देखभाल न करताच देयक लाटल्याचा आरोप झाल्याने याची चौकशी करण्यात आली होती. यात तीन महिन्यांच्या ८ कोटी १० लाखांच्या देयकांत घोटाळा झाल्याचे निदर्शनास आले होते. याप्रकरणी पालिका आयुक्तांनी उद्यानांचा सर्वसमावेशक ठेकाच रद्द केला होता व ठेकेदाराला ८ कोटींपेक्षा अधिक दंड ठोठावण्यात आला होता. याविरोधात  लवादाने नुकताच अंतिम निर्णय दिला. यात ठेकेदारांवर पालिका आयुक्तांनी केलेली कारवाई ही चुकीची असल्याचे सांगत त्यांना ठेका रद्द न करता त्यांच्याकडून काम करून घ्यावे. तसेच दंडात्मक कारवाई ही चुकीची असल्याचे म्हटले आहे.

याविरोधात पालिका प्रशासनाने आव्हान देणार असल्याचे सांगितले होते. सोमवारी पालिका प्रशासनाने उच्च न्यायालयात कलम ३० अन्वये अपिल केले आहे. पालिकेने आपली बाजू पुराव्यासह मांडल्यानंतरही लवादाने पालिकेविरोधात निर्णय दिल्यामुळे हे अपिल केले असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

मंदा म्हात्रे यांचा उपोषणाचा इशारा

याप्रकरणी आमदार मंदा म्हात्रे यांनी तक्रार केली होती. त्यानुसार आयुक्तांनी चौकशी समिती नेमत केलेल्या चौकशीत घोटाळा झाल्याचे उघड झाले होते. आता लवादाने पालिकेची कारवाई चुकीची असल्याचा निर्णय दिला आहे. यामुळे तक्रारदार मंदा म्हात्रे आक्रमक झाल्या आहेत. पालिका अधिकऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला मदत व्हावी म्हणून याप्रकरणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. स्थानिक ठेकेदारांवर अन्याय होत असून याविरोधात उपोषण करणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 12:06 am

Web Title: action municipal administration contractors akp 94
Next Stories
1 एमआयडीसीतील अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष
2 मुदतवाढ नको, आता सिडको घरांचा ताबा द्या!
3 जुलैपर्यंत शहरातील सर्व ज्येष्ठांना किमान एक मात्रा!
Just Now!
X