कारवाई करण्याचे संकेत

पनवेल : जमावबंदी असताना मित्रांसमवेत केलेली वाढदिवसाची पार्टी आता पनवेलमधील भाजप नगरसेवकाला चांगलीत महागात पडणार आहे. या पार्टीची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली असून पालिका आयुक्तांना सरकारच्या प्रचलित कायदे व धोरणानुसार संबंधित सदस्यावर तात्काळ कारवाठ्र  करावी, असे कळविले आहे. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद धोक्यात आल्याची चर्चा आहे.

पनवेलमधील प्रभाग क्रमांक २० मधील नगरसेवक अजय बहिरा यांनी संचारबंदीत मित्रांसमवेत केलेली पार्टी पोलीस कारवाईमुळे उजेडात आली होती.  त्यामुळे सर्व स्तरांतून संताप व्यक्त होत आहे. पनवेल संघर्ष समितीने बहिरा यांचे नगरसेवकपद अपात्र करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मुख्यमंत्री कार्यालयाने बुधवारी या मागणीची दखल घेत पनवेल पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना तातडीने या प्रकरणी लक्ष घालावे असे कळविले आहे. तसेच सरकारच्या प्रचलित कायदे व धोरणानुसार संबंधित सदस्यावर तात्काळ कार्यवाही करून संबंधित कार्यवाहीचा अहवाल पनवेल संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना आणि कोकण विभागीय आयुक्तालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाला पाठविण्याचे आदेश मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दिले. पोलिसांनी सदस्य बहिरा यांच्यासह त्यांच्या दहा मित्रांवर साथरोग प्रतिबंधक अधिनियम, कोविड १९ उपाययोजना नियम, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदविले आहेत.