पुढील आठवडय़ात अतिक्रमणविरोधी कारवाई

शीव-पनवेल महामार्गावर पळस्पे ते कळंबोली सर्कलदरम्यानची अतिक्रमणे हटविण्यात आल्यानंतर आता पनवेल शहरातील रस्त्यांकडेला असलेली बेकायदा बांधकामे, झोपडय़ा आणि व्यापारी गाळ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांनी यासाठी एक आराखडा तयार केला आहे. दुकानांसमोरील मोकळी जागा, पदपथांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. याशिवाय फेरीवाल्यांनी रस्त्याचा ताबा घेतला आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.

गेल्या अनेक वर्षांपासून महामार्गानजीक सुमारे ५०० बेकायदा बांधकामे उभारण्यात आली होती.

गुरुवारी महामार्गानजीक उभारलेली बेकायदा बांधकामे तोडण्यात आली. या परिसरातील ही पहिलीच अशी मोठी कारवाई असल्याचे पालिकेने सांगितले.

शहरातील अतिक्रमणविरोधी कारवाईत अडथळा आणणाऱ्यांवर वेळीच कारवाई केली जाणार आहे. यासाठी पालिका प्रशासनाने तयारी केली आहे. पदपथावर चालण्यासाठी नागरिकांना जागा नाही. पनवेल शहरातील ही पहिलीच मोठी कारवाई असेल. अतिक्रमण करणाऱ्या दुकानदाराकडून कारवाईचा खर्च वसूल करण्यात येणार आहे. याबाबतची सूचना दुकानमालकांना देण्यात आली आहे. येत्या आठवडय़ात कारवाई सुरू होईल.