पामबीच मार्गावर कोपरीगाव ते अरेंजा कॉर्नपर्यंतच्या बेकायदा पार्किंगवर पालिकेने बुधवारी कारवाई केली. वाहतूक विभागाच्या साहाय्याने एकूण १३ वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून दहा हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

पालिकेने पामबीचच्या पदपथावर लोखंडी जाळी लावण्याचे काम सुरू असताना दुकानांचा पामबीचकडील प्रवेशच कायमस्वरूपी बंद केल्यास येथील बेकायदा पार्किंगला आळा बसेल, असे मत वाहतूक विभागाने व्यक्त केले आहे.

पामबीचवरील बेकायदा पार्किंगमुळे वाहतुकीला आणि रहदारीला अडथळा निर्माण होत असतो. याशिवाय येथील सफाईच्या कामालाही अडथळे निर्माण होत असतात. या भागात बेकायदा गॅरेज आणि वाहनांच्या सुट्टय़ा भागांच्या विक्रीची दुकाने आहेत. गॅरेजमधील वाहने दुरुस्तीनंतर रस्त्यांवरच ठेवली जातात. याचा वाहतुकीला अडथळा होतो. गॅरेजमालक कामासाठी वापरलेले साहित्य आणि तेलमिश्रित पाणी रस्त्यावर फेकून देतात. त्यामुळे या भागांत मोठय़ा प्रमाणावर अस्वच्छता असते. याविषयीचे वृत्त अनेकदा छापून आले आहे. त्यामुळे ही कारवाई हाती घेण्यात आली.

पालिका व वाहतूक विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा वाहनांच्या चाकांना जामर लावण्यात आले. दुरुस्ती सुरू असलेल्या या वाहनांवर पालिकेने दंडात्मक कारवाई केली. बेकायदा पार्किंग करणाऱ्यांकडून ४०० रुपये तर दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या वाहनांकडून दंडात्मक वसुली करण्यात आली. एपीएमसी वाहतूक विभागाचे निरीक्षक अभय महाजन तसेच पालिका उपायुक्त अमरिश पटनिगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.