सर्वाधिक बांधकामे घणसोली व ऐरोलीत; पावसाळ्यानंतर कारवाईचे सिडकोचे संकेत

सिडको हद्दीतील बेकायदा धार्मिक स्थळांबाबत येत्या १५ दिवसांत निर्णय घेऊन अहवाल देण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी दिल्यानंतर सिडकोने बुधवारी शहरातील पावणेदोनशे आणि दक्षिण नवी मुंबईतील ३०७ बेकायदा बांधकामांची यादी जाहीर केली आहे. यात धार्मिक स्थळांची संख्या मोठी आहे. या बांधकामांना बेकायदा बांधकामे म्हणून नमूद केले आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात या धार्मिक स्थळांवर कारवाई होणार आहे. यात घणसोली व ऐरोलीतील सर्वाधिक बांधकामे आहेत.

नवी मुंबईत ३४८ बेकायदा धार्मिक स्थळे आहेत. ही बांधकामे सिडको, पालिका, एमआयडीसी, वन आणि रेल्वेच्या जमिनीवर आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व बेकायदा धार्मिक स्थळे १७ नोव्हेंबपर्यंत पाडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक पार पडली. त्यात या बांधकामांवर त्या-त्या प्राधिकरणांनी येत्या १५ दिवसांत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

गणेशोत्सवानंतर कारवाईला वेग

सिडकोच्या जमिनीवर पालिका क्षेत्रात १३१ बेकायदा धार्मिक स्थळे आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सिडकोने बुधवारी सर्व बेकायदा बांधकामांची यादी प्रसिद्ध केली. यात धार्मिक स्थळांचादेखील समावेश आहे. यात नवी मुंबई पालिका क्षेत्रातील १८६ व रायगड जिल्ह्य़ातील सिडको हद्दीतील ३०७ बेकायदा बांधकामे आहेत. गणेशोत्सवानंतर कारवाईला वेग येणार आहे. त्यामुळे सिडकोने मोठय़ा पोलीस बंदोबस्ताची मागणी आयुक्तालयाकडे केलेली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने त्रिपक्ष करार होऊन नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी सहा महिन्यांतून एकदा बेकायदा बांधकामांची यादी प्रसिद्ध केली जाते. यात बेकायदा धार्मिक स्थळांचाही समावेश आहे. बेकायदा बांधकामांवर सिडकोची कारवाई सातत्याने सुरू आहे, पण येत्या काळात धार्मिक स्थळांवरदेखील कारवाई केली जाणार आहे.

डॉ. मोहन निनावे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, सिडको