भरघाव दुचाकी चालविणाऱ्या विद्यार्थ्यांवर भारतीय दंड कायद्यानुसार कारवाई न करता ऐरोली येथे पोलिसांनी त्यांना व्यायामाची शिक्षा केली. त्यामुळे अनेकांचा घाम निघाला. सकाळी आणि सायंकाळी  फिरण्यास बाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या मार्गात या वेगवेडय़ा दुचाकीस्वारांचा त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या.

नवी मुंबईला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, नेरुळ, सीबीडी येथे नैर्सगिक वातावरण निर्माण झाल्याने मॉर्निग वॉकच्या जागा या परिसरात झाल्या आहेत. त्यामुळे नवी मुंबई पालिकेने या परिसरांना सुशोभित करून सकाळ-संध्याकाळ नागरिकांना फिरण्याच्या जागा विकसित केल्या गेलेल्या आहेत. या मॉर्निग वॉक परिसरात अलीकडे जवळच्या महाविद्यालयातील विद्यार्थी धूम स्टाइलने मोटारसायकल चालवीत असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे येत आहेत. यात हात सोडवून मोटारसायकल चालविणे, मोठय़ाने आवाज करणे, ओरडणे, किंकाळणे, गाणी बोलणे, अश्लील चाळे करणे, गाडय़ांचा कर्णकर्कश आवाज करणे, अशा सर्व कृत्यांचा समावेश आहे. रबाले पोलिसांनी बुधवारी सकाळी एका साध्या मारुती व्हॅन गाडीतून गस्त सुरू केली असताना जवळच्या मेहता महाविद्यालयातील चार वेगवेडय़ा विद्यार्थी आणि त्यांच्या मागे तेवढय़ाच विद्यार्थिनी धूम स्टाइलने दुचाकी चालवीत होते.

यात एका दुचाकीवर तीन विद्यार्थी दंगा करीत होते. त्यांना पोलिसांनी बर्न रुग्णालयाजवळ अडवले आणि समज दिली. केवळ समज देऊन या विद्यार्थ्यांना गुन्ह्य़ाचे गांभीर्य कळणार नसल्याने त्यांना उठाबशा, कोंबडा, माकड उडय़ा, लांब उडय़ा आणि स्ट्रेचिंग करायला लावले. सकाळी नागरिकांनी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे समाधान व्यक्त केले. या विद्यार्थ्यांच्या अशा दुचाकी चालविल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.