अडीच कोटी रुपयांची वाळू, उपसा पंप जप्त

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात एकीकडे मातीचा भराव केला जात असताना, दुसरीकडे काही वाळूमाफिया खाडीतील वाळूचा उपसा करत आहेत. प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने त्यांचे फावले आहे. या वाळूमाफियांवर गुरुवारी उपविभागीय कार्यालय, तहसीलदार व पोलिसांनी मोठी कारवाई केली.

अडीच कोटी रुपयांची वाळू, ४० ते ४५ उपसा पंप जप्त करण्यात आले आहेत. वाळू साठवणुकीची ठिकाणे नष्ट करण्यात आली आहेत. ही कारवाई रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. जप्त केलेली वाळू पुन्हा खाडीत टाकण्यात आली आहे. या कारवाईसाठी ६ बुलडोझर, ५ ते ६ पोकलेन, कटर मागविण्यात आले होते, अशी माहिती पनवेलचे प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी दिली. कोणालाही अटक केली नसून कारवाई होत असल्याचे पाहताच तेथील कामगारांनी पळ काढल्याचे उपस्थितांनी सांगितले.

पनवेल तालुक्यातील कोल्ही-कोपर परिसरातील चार-पाच घरे वगळता पूर्ण गाव रिकामे झाले आहे. परिसर मोकळा झाला आहे. याच परिस्थितीचा फायदा वाळूमाफियांनी घेतला आहे. गुरुवारी केलेल्या कारवाईतही काहींना ताब्यात घेण्यात आले, मात्र ते वाळूमाफिया नसून मजूर असल्याचे स्पष्ट झाले. या भागात वाळू उत्खनन मोठय़ा प्रमाणात होत असून वाळूचे ढिगारेही आढळले आहेत.