५०० चौरस मीटरवरील बांधकामे हटविली

नेरुळ येथील सिडकोच्या भूखंडांवरील अतिक्रमणांवर बुधवारी धडक कारवाई करण्यात आली. नेरुळ सेक्टर ६ सारसोळे येथील कारवाईला स्थानिक नागरिकांनी विरोध केला, मात्र चोख पोलीस बंदोबस्तात येथील पत्र्याची शेड, पानाची टपरी आणि मंदिर पाडण्यात आले. सुमारे ५०० चौरस मीटर भूखंडावरील बेकायदा बांधकामे हटविण्यात आली.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात तसेच सिडको, एमआयडीसीच्या अनेक भूखंडांवर अतिक्रमण करून जागा बळकावण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळेच एमआयडीसी, सिडको, पालिका क्षेत्रात नियंत्रण ठेवण्याचे काम पालिका, सिडको, एमआयडीसीमार्फत करण्यात येते. परंतु संबंधित आस्थापनांनी अतिक्रमणांबाबत नोटिसा बजावूनही दुर्लक्ष केले जाते.

न्यायालयाच्या आदेशानुसार पावसाळ्यात राहत्या घरांवर कारवाई करता येत नाही. परंतु सुरू असलेल्या बांधकामांवर तसेच व्यावसायिक अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येते. त्यानुसार सिडकोने मंगळवारी कारवाई केली आहे.

नेरुळमध्ये पूनम टॉवरच्या मागील बाजूस असलेल्या, सेक्टर २० प्लॉट क्रमांक ३७९ व ८० येथील बांधकामांवर कारवाई करण्यात आली.  यापुढेही अशाच कारवाया करण्यात येणार असल्याचे कळते.

सकाळी कारवाई संध्याकाळी ‘जैसे थे’

सिडकोने सोमवारी सीवूड्स रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या तांडेल मैदानाच्या बाजूला असलेल्या बेकायदा रोपवाटिकांवर कारवाई केली. परंतु सिडकोची ही कारवाई औटघटकेची ठरली. सायंकाळी पुन्हा त्या जागी झोपडी बांधण्यात आली आणि रोपवाटिकाही जैसे थे करण्यात आली.

सिडकोने येथील मंदिराला नोटीस बजावली होती. त्यामुळे नियमानुसार कारवाई करून बेकायदा मंदिर हटविले आहे. या कारवाईला विरोध झाला, पण चोख पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. बेकायदा रोपवाटिकांवरही कारवाई करण्यात आली.

-पी. बी. रजपूत, अतिक्रमण नियंत्रण अधिकारी, सिडको