महापालिका आयुक्तांचा आढवा बैठकीत इशारा

नवी मुंबई</strong> : करोना संकटाशी सामना करत असताना महापालिका प्रशासना पावसाळापूर्व कामांवरही लक्ष ठेवून आहे. आतापर्यंत ३० टक्के कामे झाल्याचा दावा प्रशासनाने केला असून रस्त्यांवर एकही खड्डा असल्याची तक्रार प्राप्त झाली तर संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिला आहे.

पावसाळापूर्व कामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यात आयुक्तांनी आतापर्यंत झालेल्या कामांचा आढावा घेतला. रस्ते खोदकामसंबंधित कोणतीही कामे १५ मेपर्यंत पूर्ण करावीत व ३१ मेपर्यंत डागडुजी करून रस्ते पूर्ववत करावेत. नाले व गटारे सफाई २५ मेपर्यंत पूर्ण करावी, असे या वेळी निर्देश दिले.

गेल्या काही वर्षांपासून शहरात पाणी तुंबण्याच्या घटना वाढत आहेत. त्यात या काळात मोठी भरती असताना अतिवृष्टी झाल्यास शहराच्या काही भागांत पाणी साचत आहे. त्यामुळे आवश्यक क्षमतेचे पाणी उपसा पंप पुरेशा संख्येने उपलब्ध  ठेवावेत.

धारण तलावांच्या दरवाजांची दुरुस्ती, पम्पिंग स्टेशनमधील आवश्यक बाबींची पूर्तता, अतिरिक्त पंप व्यवस्था, तेथील विद्युत पुरवठय़ासाठीची पर्यायी व्यवस्था, अंडरपासमध्ये पाणी साठण्याच्या संभाव्य ठिकाणी पंप व्यवस्था, धोकादायक विद्युत खांब आधीच काढून टाकावेत, महानगरपालिकेच्या इमारतींची आवश्यक दुरुस्ती करावी आणि मोरबे धरण प्रकल्पस्थळी पावसाळ्याच्या अनुषंगाने कामे २५ मेपर्यंत पूर्ण कराव्यात अशा सूचना या वेळी त्यांनी दिल्या व या सर्व कामांसाठी २५ मेपर्यंतची मुदतही या वेळी त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.

गटार सफाई ३० टक्के पूर्ण

नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली असूनही पावसाळी गटारे सफाईची कामे ३० टक्के पूर्ण झाली असून उर्वरित कामे व नालेसफाई १५ ते २० मेपर्यंत पूर्ण होतील अशी माहिती पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाने दिली. सफाईनंतर काठाशी काढून ठेवला जाणारा गाळ थोडासा सुकल्यानंतर लगेच उचलला जाईल. पावसाळी कालावधीत वेळेत कचरा उचलण्याकडे अधिक काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना असल्याचेही त्यांनी सांगितले.