वाहनचालकांना अभिनेता स्वप्निल जोशी यांचे आवाहन; रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप

नवी मुंबई</strong> : रस्ते अपघात रोखायचे असतील तर वाहनचालकांनी स्वयंशिस्त पाळणे महत्त्वाचे आहे. मी आजपासून वाहतुकीचे प्रत्येक नियम पाळण्याची जबाबदारी घेत आहे, तुम्ही घ्या, असे आवाहन अभिनेता स्वप्निल जोशी यांनी केले. बुधवारी रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.  याप्रसंगी ज्येष्ठ संगीतकार, गायक शंकर महादेवन यांच्या गाण्यांची मैफल रंगली.

१८ जानेवारी ते १७ फेब्रुवारीदरम्यान नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला. याचा समारोप वाशीतील विष्णुदास भावे नाटय़गृहात आयोजित केला होता. या वेळी प्रमुख पाहुणे स्वप्निल जोशी, संगीतकार गायक शंकर महादेवन, बोलक्या बाहुल्यांचे खेळ दाखवणारे कलाकार सत्यजित पाध्ये, यांच्यासह पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिह, अप्पर पोलीस आयुक्त बी.जी. शेखर पाटील, सहआयुक्त जय जाधव, पनवेलचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अभय देशपांडे तसेच पोलीस विभागातील अनेक अधिकारी उपस्थित होते.

या वेळी शंकर महादेव यांनी या सप्ताहात मला ‘एक दिवस पोलिसांसमावेत’ या उपक्रमात सहभागी करीत पोलीस होण्याची संधी दिल्याबद्दल नवी मुंबई पोलिसांचे आभार मानले. वाहतुकीचे नियम पाळणे आणि शून्य अपघात हेच लक्ष, असा संदेश त्यांनी या वेळी दिला, तर ‘पपेट शो’च्या माध्यमातून वाहतूक नियमांबाबत जनजागृतीसाठी एक लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता आले हे माझे भाग्य असल्याचे कलाकार सत्यजित पाध्ये यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिह यांनी इतर शहरांच्या तुलनेत नवी मुंबईची वाहतूक व्यवस्था चांगली असल्याचे सांगत ‘शून्य अपघात, शून्य मृत्यू’ हे ध्येय गाठायचे आहे. यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. रस्ता सुरक्षा सप्ताहामध्ये सहकार्य केलेल्या नागरिकांचा व विशेष कामगिरी केलेल्या पोलिसांचा या वेळी सत्कार करण्यात आला.

वाहतूक सप्ताहातील साध्य..

* एक दिवस पोलिसांसमवेत या उपक्रमात तीन हजार मान्यवरांनी सहभाग घेतला. यात कलाकार, प्राध्यापक, शिक्षक, वकील, डॉक्टर, सामान्य नागरिकांसह महिला न्यायाधीशांच्या समावेश होता.

* या सप्ताहात आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिरे यासह ‘मॅरेथॉन’ स्पर्धेत देश-विदेशातील १२०० स्पर्धकांनी सहभाग घेतला.

* ऑनलाइन ‘पपेट शो’द्वारे १८२ शाळांतील १ लाख विद्यार्थ्यांपर्यंत वाहतूक नियमांबाबत जागृती करण्यात आली. त्यात त्यात २७ हजार अभिप्राय मिळाले.

* या वेळी प्रथमच गांधीगिरी न करता नियम न पाळणाऱ्या ३ हजार जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.