आदर्श को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, घणसोली, सेक्टर-९

दोन भव्य प्रवेशद्वारे.. संरक्षक भिंतीला लागून काजू, नारळ, निलगिरी आणि शोभेची झाडे. त्यामुळे कडक उन्हातही गारवा. सोसायटीच्या आवारात भरपूर मोकळी जागा.. घणसोली सेक्टर-९ येथील आदर्श को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये परंपरा आणि पर्यावरणाचा मेळ साधलेला दिसतो.

घणसोली सेक्टर-९ मध्ये घरोंदा येथे २००४ साली सिडकोने हे नियोजनबद्ध संकुल उभारले. डी-१ ते डी-१५ अशा १५ इमारतींत सुमारे २८८ कुटुंबांचे वास्तव्य आहे. आवारात ऐसपैस मोकळी जागा आहे. येथील रहिवाशांत मराठी भाषकांची संख्या मोठी आहे. मध्यवर्ती भागात भव्य सभामंडप आहे. सोसायटीतील विवाह, वाढदिवस, पूजा आणि अन्यही अनेक सोहळे या सभामंडपात होतात. त्यासाठी नाममात्र भाडे आकारण्यात येते. लहान मुलांना खेळता यावे म्हणून छोटेखानी मैदान आहे. मोबाइल आणि टीव्हीच्या सापळ्यात मुले अडकून पडण्याच्या जमान्यात या सोसायटीतील मुले मात्र या मैदानात मनसोक्त खेळताना दिसतात. सोसायटीच्या मध्यवर्ती भागात बाग आहे. त्यात पिरॅमिड, गोलाकार, घुमटाकार प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत.

सोसायटीत गणेशोत्सवात पाणीबचत, स्त्री भ्रूणहत्या इत्यादी विषयांवर आधारित देखावे उभारले जातात. त्या माध्यमातून सामाजिक जागृती करण्यात येते. श्रावणात मंगळागौरीचे खेळही उत्साहात खेळले जातात. महिलांसाठी हळदीकुंकू, लहान मुलांसाठी नृत्याचे कार्यक्रम ठेवण्यात येतात. २६ जानेवारीला सत्यनारायणाची महापूजा ठेवण्यात येते. पूजेला बसण्याचा मान सोसायटीतील नवविवाहित जोडप्यांना देण्यात येतो. नवरात्रोत्सवात सभामंडपात देवी बसवतात. नऊ दिवस सोसायटीमध्ये भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात येतो. दसऱ्याला सभामंडपात सर्व रहिवासी एकत्र जमून सोने लुटतात. वर्षांतून एकदा सभामंडपात स्नेहसंमेलन ठेवण्यात येते. इमारतीखालील मोकळ्या जागेत हिरवळ जोपासण्यात आली आहे. वृक्षांच्या देखरेखीसाठी दोन माळी आहेत.

मंदिराला लागूनच ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा बांधण्यात आला आहे. येथे रोज वर्तमानपत्रे ठेवण्यात येतात. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांना चालू घडामोडी आणि त्यांचे विश्लेषण जाणून घेता येते. सकाळी व संध्याकाळी ज्येष्ठ नागरिक जमतात. रोज सायंकाळी ७.३० वा. होणाऱ्या आरतीच्या वेळी रहिवासी एकत्र येतात. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला येथील मंदिराबाहेर सकाळी ६ वाजल्यापासून भक्तांच्या रांगा दर्शनासाठी लागतात.  फलाहार, खजूर, खिचडीचा प्रसाद ठेवण्यात येतो. निवृत्त प्रशासकीय किंवा पोलीस अधिकाऱ्याच्या हस्ते झेंडावंदन होते.

प्रत्येक इमारतीखाली पार्किंगसाठी स्वतंत्र जागा ठेवण्यात आली आहे. १ एप्रिलपासून सोसायटीचे सर्व रोख व्यवहार बंद करण्यात आले आहेत. आता धनादेशाद्वारेच सर्व व्यवहार केले जातात. दैनंदिन कामकाज सांभाळण्यासाठी अकाऊंटंट नियुक्त करण्यात आला आहे. याशिवाय लेखापालामार्फत लेखापरीक्षणही करून घेतले जाते. वार्षिक सर्वसाधारण सभेत ते मांडण्यात येते.  या वेळी घरोंदा सार्वजनिक सप्ताहात सोसायटीच्या वतीने एकदिवसीय भंडारा ठेवण्यात येतो. सोसायटीत सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी सध्या नियोजन सुरू आहे. यासाठी निधीची जमवाजमव सुरू असल्याचे अध्यक्ष संदीप गालगुडे यांनी सांगितले.

पर्यावरण रक्षण

सोसायटीच्या संरक्षक भिंतीला लागून चारही बाजूंनी काजू, नारळ, निलगिरी आणि शोभेची झाडे लावली आहेत. आवारात जिथे झाडांची सावली पडते, तिथे दगडी बाक लावण्यात आले आहेत. २४ तास पाण्याची सोय करण्यात आली आहे. सोसायटीतील रहिवाशांचे पाणी देयक देखभाल खर्चातूनच भरले जाते. ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी, रहिवाशांची झोपमोड होऊ नये म्हणून, आजारी व्यक्तींना त्रास होऊ नये म्हणून सोसायटी आवारात हॉर्न वाजविण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसे संदेश फलकही लावण्यात आले आहेत.