अतिदक्षता खाटांचा तुटवडा भासणार

सद्य:स्थितीत १४४ खाटा शिल्लक; आणखी ५०० खाटा वाढविण्याचे नियोजन

नवी मुंबई : शहरातील वाढती दैनंदिन रुग्णसंख्या व उपचाराधीन रुग्णांची संख्या पाहता खासगी रुग्णालयांत खाटा शिल्लक दिसत नाहीत, तर पालिकेची व्यवस्थाही अपुरी पडणार असून खाटांचा तुटवडा भासणार आहे. प्राणवायू व साध्या खाटांची उपलब्धता होऊ शकते मात्र अतिदक्षता खांटांसाठी मोठी गैरसोय होणार आहे. सद्य:स्थितीत १४४ अतिदक्षता खाटा शिल्लक आहेत.

पालिका आयुक्तांनी ४४३ अतिदक्षता खाटा सद्य:स्थितीत आहेत, यात लवकरच दुपटीने वाढ करण्यात येणार असून  ९०० अतिदक्षता खाटांचे नियोजन असल्याचे सांगितले. त्यामुळे पुढील काही दिवस अत्यवस्थ रुग्णांची गैरसोय होणार नाही. मात्र दैनंदिन रुग्णवाढ अशीच काही दिवस सुरू राहिली तर मात्र आरोग्य व्यवस्था अपुरी पडू शकते.

शहरात जानेवारी, फेब्रुवारीत करोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने करोना खाटांच्या निर्मितीचे काम थांबवण्यात आले होते. रहेजा तसेच वाशी कामगार रुग्णालयात या खाटा वाढविण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र रुग्ण कमी झाल्याने ते काम थांबविण्यात आले होते.

मात्र गेला दीड महिना शहरात सातत्याने करोना रुग्णांत मोठी वाढ होत आहे. १ मार्च रोजी शहरात दैनंदिन रुग्णांची संख्या १३६ होती ती आता आठशेपेक्षा अधिक झाली आहे. हा रुग्णवाढीचा दर १५ टक्केंपर्यंत गेला आहे. तर उपचाराधीन रुग्णांची संख्याही सहा हजारांपेक्षा अधिक झाली आहे. यातील काही जण गृहअलगीकरणात आहेत. तर यापैकी १८५९ रुग्ण हे विविध रुग्णालयांत उपचार घेत असल्याचे गुरुवारी महापालिकेच्या संकतेस्थळावरील डॅशबोर्डवरील माहितीनुसार दिसत आहे. सद्य:स्थिीत ४४३ अतिदक्षता खाटा उपलब्ध असून त्यापैकी २९९ जण उपचार घेत आहेत. तर १४४ खाटा शिल्लक आहेत. १६ पैकी दहा खासगी रुग्णालयांत शिल्लक खाटांची संख्या शून्य इतकी आहे. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या पाहता या अतिदक्षता खाटांचा तुटवडा निर्माण होणार आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने अतिदक्षता खाटांची संख्या ९०० पर्यंत करण्याचे नियोजन केले आहे. यात वाशी प्रदर्शनी केंद्रात  ७५ अतिदक्षता खाटा सुरू करण्यात येणार आहेत.  डॉ.डी.वाय. पाटील रुग्णालयात सध्या शंभर अतिदक्षता खाटांवर उपचार सुरू आहेत. येथे दोनशे खाटा वाढविण्यात येणार आहेत. तर शहराबाहेरील पनवेल पालिका हद्दीतील एमजीएम रुग्णालयाबरोबर १०० अतिदक्षता खाटांची बोलणी झाली असून त्या ठिकाणी सेवा सुरू होईल, असा विश्वास पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला आहे.

सरासरी दिवसाला नवीन १ हजार रुग्ण वाढण्याची शक्यता असल्याने अतिदक्षता खाटांची सुविधा वाढवण्यात येत आहे. कोमोठे येथील एमजीएम रुग्णालय यांच्यासोबत १०० अतिदक्षता खाटा करण्याचे नियोजन आहे.  त्यादृष्टीने उपाययोजना सुरू आहेत. – अभिजीत बांगर, आयुक्त नवी मुंबई महापालिका