उत्तीर्णापेक्षा अधिक जागा
उरण तालुक्यातील दहावीचा निकाल ९० टक्केपेक्षा अधिक लागला असून २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांत ११ वीच्या उरणमधील कनिष्ठ महाविद्यालयात एकूण २ हजार ३४७ जागा होत्या तर २०१६ मध्ये दहावी उत्र्तीण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २ हजार ६९ आहे. यावर्षी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना उरण तालुक्यातीलच कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेत अधिक जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे ११ वीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश सुखकर होणार आहे. २०१५ च्या दहावीच्या परीक्षेत उरण तालुक्यात एकूण २ हजार २०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. सोमवारी दहावीचा निकाल लागल्यानंतर अनेक ठिकाणी ११ वीच्या प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. काही ठिकाणी ११ वीच्या जागांपेक्षा अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण होणार आहे. मात्र उरण तालुक्यात दहावीचा निकाल २०१५ पेक्षा यावर्षी दोन टक्क्य़ांनी कमी लागला आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण १२ कनिष्ठ महाविद्यालयात असलेल्या ११ वीच्या जागांपेक्षा विद्यार्थी संख्या कमी आहे. तर दहावीनंतर आयटीआय, डिप्लोमा तसेच इतर टेक्निकलचे अभ्यासक्रम घेणारे, त्याचप्रमाणे चांगल्या महाविद्यालयाची वाट धरणारेही विद्यार्थी असल्याने या जागा शिल्लक राहण्याची शक्यता आहे. उरण तालुक्यात अशा प्रकारची स्थिती प्रथमच निर्माण झाली आहे. गेली अनेक वर्षे ११ वीच्या प्रवेशासाठी शिक्षण विभागाला महाविद्यालयांना जागा वाढविण्यासाठी सांगावे लागत होते. मात्र यावर्षी या उपलब्ध असलेल्या जागा भरल्या जातील का असा प्रश्न आहे.