नवी मुंबई : दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या बसला आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातानंतर मदतकार्यासाठी शेकडो हात सरसावले. नवी मुंबई, ठाण्यातील गिर्यारोहकांच्या ‘अ‍ॅडव्हेंचर हाय’ या संस्थेने यात महत्त्वाची भूमिका बजावली. खोल दरीत अडकून पडलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी या संस्थेच्या सदस्यांनी साहाय्य केले. गिर्यारोहकांसाठी मदतकार्याचा अनुभव हेलावून सोडणारा होता.

आंबेनळी घाटामध्ये दापोली येथील विद्यपीठाची बस दरीत कोसळल्याचे कळताच स्थानिक गिर्यारोहक घटनास्थळी पोहोचले. डॉ. सूर्यवंशी तसेच उपजिल्हाधिकारी शितोळे यांनी अ‍ॅडव्हेंचर हाय या संस्थेचे राहुल समेळ, मंदार गुप्ते, अमोल देशपांडे यांना घटनास्थळी पाचारण केले. आवश्यक साधने घेऊन संस्थेने ९ सदस्य आणि दोन चालक  घटनास्थळी रवाना झाले.

११.३०च्या सुमारास घटनास्थळी पोहोचलो. तोपर्यंत महाबळेश्वर ट्रेकर्स व इतर ट्रेकर्सच्या मदतीने १४ मृतदेह बाहेर काढण्यात आले होते.  नंतर अंधारात १६ मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू झाले. एनडीआरएफ व ‘अ‍ॅडव्हेंचर हाय टीम’ यांनी कामाला सुरुवात केली.  दरीत मिट्ट काळोख होता. मृतदेह गाडीच्या भागामध्ये असल्याने कटरच्या साहाय्याने गाडीचे भाग कापून त्यांना बाहेर काढण्याचे काम टीमला करावे लागले. पोलीस तपासात महत्त्वपूर्ण ठरणारे  साहित्यही बाहेर काढण्यात आले. दुसऱ्या दिवशी ही मोहीम थांबवण्यात आली.

मोहिमेत सहभागी..

मंदार गुप्ते, अमोल देशपांडे, राहुल समेळ, अनिल उंडे, सुनील उंडे, गीत नाईक, सागर कांबळे,किरण सावंत,अमोल देशपांडे, अभिजित नाचरे.

हा अनुभव हादरवणारा होता. निसर्गाने दिलेली साथ व माणुसकीच्या प्रेरणेने सर्वानीच एकजुटीने केलेले प्रयत्न मोलाचे ठरले. तंत्रज्ञान जिथे हात टेकते, तिथे माणसांनी केलेली प्रयत्नांची शर्थ उपयुक्त ठरते. माणुसकीची व एकजुटीची प्रचीती या मदतकार्यादरम्यान आली.

– अमोल देशपांडे, अ‍ॅडव्हेंचर होप