पहिल्या टप्प्याच्या विकासासाठी अकरा कोटींच्या निधीला मंजुरी; पर्यटकांची संख्या तिपटीने वाढण्याचा अंदाज

मुंबईपासून अवघ्या ४५ किलोमीटर म्हणजेच तासाभराच्या अंतरावर असणारे पनवेल तालुक्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्य आता लवकरच ‘पर्यटकस्नेही’ बनणार आहे. यासाठी बनविण्यात आलेल्या विकास आराखडय़ाला मंजुरी देण्यात आली असून, पहिल्या टप्प्याच्या विकासासाठी ११ कोटी ६५ लाख रुपयांच्या कामाला बुधवारी वनमंत्र्यांनी मंजुरी दिली. हे काम १५ महिन्यात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे येथे पर्यटकांची संख्या तिपटीने वाढण्याचा अंदाज आहे.

सहा महिन्यांपासून या अभयारण्याचा विकास करण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न सुरू होते. तुटपुंज्या सेवासुविधा असल्याने येथील पर्यटकांची संख्या कमी होत असल्याचे वन विभागालाही समजल्यानंतर येथील निसर्ग पर्यटन केंद्राच्या हालचालींना वेग आला.

१२.११ चौरस किलोमीटर क्षेत्रावर ‘कर्नाळा’चा विस्तार आहे. पक्ष्यांच्या १२३ प्रजाती, सापाच्या २३, तर फुलपाखरांच्या ५६ प्रजाती अशा वैविधतेने हा परिसर नटलेला आहे. स्थलांतरित होणारे परदेशी पक्षी पर्यटकांसाठी आकर्षण आहे. २०१६ मध्ये या अभयारण्यात ९१ हजार तर २०१७ मध्ये ८८ हजार पर्यटक आणि २०१८ मध्ये ८० हजार पर्यटकांनी भेटी दिल्या. यामधून सरकारी तिजोरीत ९९ लाख रुपयांचा महसूल शुल्काच्या रूपात जमा झाला.

पुणे येथील वास्तुविशारद इंद्रजीत नागेशकर यांनी चार महिने कर्नाळाच्या प्रत्येक नैसर्गिक रचनेचा विचार करून विकास आराखडा तयार करून तो वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर सादर केला. त्यामध्ये पक्षी अभयारण्याची माहिती व चित्रीकरण दाखविणारी ‘सेव्हन डी’ सिनेमागृह, लाकडी घरे, अ‍ॅडव्हेंचर पार्क, जेवणाच्या व्यवस्थेसाठी हॉटेल, नैसर्गिक धबधब्याचा आनंद घेण्यासाठी व पाहण्यासाठी लाकडी स्कायवॉक बनविण्यात येणार आहे. वसतिगृहाचीही  व्यवस्था येथे करण्यात येणार आहे. बसण्यासाठी सर्व लाकडी बाके उपलब्ध होतील. यापूर्वी कर्नाळा पक्षी अभयारण्यात हॉटेल व वसतिगृहाची संकल्पना मांडली गेली नव्हती. मात्र नवीन विकास आराखडय़ात याला मंजुरी देण्यात आली आहे. लहान मुलांना साहसी खेळही येथे खेळण्यास मिळणार आहेत. पंधरा महिन्यांचा कालावधी विकास आराखडय़ानुसार काम पूर्ण करण्यासाठी लागणार असल्याची माहिती शिरढोण ग्राम विकास समितीचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी दिली. या प्रकल्पामुळे कर्नाळा पक्षी अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या तिपटीने वाढेल आणि त्याचा नक्की लाभ स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी होईल, असेही वाकडीकर यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाचे येथील नेते महेश बालदी यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.

किल्ल्याचेही संवर्धन

विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी पोलिसांनी कर्नाळा किल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटकांना बंदीची मागणी केली होती. पर्यटक किल्ल्याच्या वरपर्यंत जातात, मात्र तेथून परत येण्यासाठी पुन्हा दुसरे बचावदल बोलवावे लागते. अशा दोन घटना लागोपाठ दोन वर्षांपूर्वी घडल्याने पोलिसांनी ही भूमिका घेतली होती. वनमंत्र्यांच्या विकास आराखडय़ाला मंजुरी दिल्यामुळे भविष्यात दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्याच्या विकास आराखडय़ात पुरातत्व विभागाकडून कर्नाळा किल्ल्याच्या पूर्व बाजूचे संवर्धन करण्यात येईल, अशी अपेक्षा पर्यटकांची आहे.

नैसर्गिक पद्धतीने विकास

कोणतेही कॉंक्रीटचे काम न करता हा विकास नैसर्गिक पद्धतीने होणार असल्याने या विकासाचे महत्त्व अधिक असल्याचे पर्यटक सांगतात. कर्नाळात होणाऱ्या विकासामुळे रानसई, कल्हे व शिरढोण या गावातील आदिवासी व तरुणांना रोजगार मिळणार आहे.