आगरी पुरुष म्हणजेच आगरी बापये आणि आगरी स्त्रिया म्हणजेच आगरी बायका. घरात जन्माला मुलगा येवो वा मुलगी, आनंदोत्सव ठरलेलाच! आर्थिक स्थिती फारशी चांगला नसली तरीही बाळाचा ‘लाठा’ म्हणजेच जन्माच्या तिसऱ्या दिवशी सुईणींकरवी केला जाणारा विधी आणि ‘सटी’ म्हणजेच पाचव्या दिवशी केली जाणारी सटवाईची पूजा हे दोन विधी होणारच, हे निश्चित. पैसाअडका असो-नसो, ‘लाठय़ाचे मुटके’ (तांदळाच्या पिठात गूळ व इतर जिन्नस मिसळून उकडून केलेले लहान लहान गोळे) व ‘सटीचे पोळे’ (तांदळाच्या पिठाचे चुलीवर भाजलेले डोसे) आणि गूळ हे ठरलेले. आज समाज सधन झाला आहे. त्यामुळे उत्साहाबरोबर या विधींच्या वेळी केली जाणारी खवय्येगिरीही वाढली आहे.

त्या काळी शाळेचा रस्ता थोडा उशिराच सापडायचा. आय (आई) आणि आबा (बाबा) जाईल तिथे, म्हणजे मिठागर व शेतावर जाण्याची भारी ओढ. शाळेच्या मास्तरांच्या छडय़ा खाण्यापेक्षा निसर्गाच्या शाळेत हरवून जाणं मुलांना आवडायचं. मदत होते म्हणून आईस-बापूस पण खूश, ज्यांचे आई-बाप समजूतदार होते त्यांची मुलं शिक्षणासाठी दूरवर जात.

ऊन, पाऊस, चिखल, पाणी यांच्याशीच ‘सोयरीक’ असल्याने त्यांचा पोशाखही निसर्गाशी साधम्र्य साधणारा होता. अंगात गंजीफ्रॉक (बंडी) आणि कमरेला चौकोनी रंगीत रुमाल त्रिकोणी घडी घालून बांधलेला असे. त्याला रुमाल किंवा लंगोटी म्हणत. पावसाळ्यात ते लाल लोकरीपासून बनलेल्या जाडसर कापडाचे अंगरखे म्हणजेच ‘कोठे’ घालत व डोक्यावर त्याच कापडाची टोपी. या टोपीच्या विशिष्ट आकारावरून आगरी-कोळी लोक सहज ओळखता येत. आत्ता फक्त वेशभूषा स्पर्धेतच ही टोपी आणि रुमाल वापरला जातो. शेतांमध्ये काम करताना विशेषत: पीक लावणीच्या हंगामात इरले घेतले जाई. बांबू आणि सुकलेल्या पळसाच्या पानांचे विशिष्ट आकाराचे हे आच्छादन पावसापासून रक्षण करीत असे.

वेगवेगळ्या आकारांत इरले बनवण्याचे कसबही आगरी व्यक्तींना अवगत असे. पारंपरिक भातशेती आणि मिठागरातलं मीठ हेच त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत. यातही ते आनंदी आणि समाधानी राहत.

‘मी हाय आगरी बापया.

बेफिकीर मी वादलान नं पावसान,

बिनधास मी उना तान्हान,

शेतीभातीन कमवलीय मीनी यी काया,

मी हाय आगरी बापया.

सुव्र्याची नं माजी रोजचीच दोस्ती,

म्हनून मीठ आपसूक यतय वरती,

डोक्यावं माजे हाय आभालाची छाया,

मी हाय आगरी बापया.

आगोठीचे दिसान धरतरी भिजतय,

म्हनून चिखलांशी भाताचा कनीस निंगतय,

कष्टाचाच खाईन, नको कंची माया,

मी हाय आगरी बापया..’

असे हे आगरी समाजातील पुरुषाचे वर्णन. शेकडो वर्षांपासूनच आगरी समाजात स्त्री-पुरुष समानता आहे. संसारातील सर्व घडामोडींत, तिचं स्थान अनन्यसाधारण आहे. ती चूल, मूल, शेती सगळ्यातच सहभागी असे. शेती आणि मिठागरातही श्रमदान करत असे. त्यामुळे तीही पुरुषांच्या इतकी राकट व बलवान होती. ‘आगोठ’ (पावसाची दमदार सुरुवात) पूर्वी शेतीची, पेरणीपूर्वीची सर्व कामे आगरी बायका ‘परकी’ (एकमेकांच्या शेतात आळीपाळीने जाणे) करून ‘हांद्यंच्या’ (जास्त संख्येने) पाळीने करत. तुटपुंजा उत्पन्नात भर पडावी म्हणून त्या भाजीचे मळे पिकवत, खाजणात (माशांची पैदास होते ती समुद्रालगतची डबकी) मासे पकडत, सरपणासाठी डोंगरात किंवा समुद्रकिनारी लाकडांची मोळी घेऊन येत. या कामांसाठी तिचे आवडते शस्त्र म्हणजे ‘कोयता’.

आजही ‘खरोल’ (भात कापायचं हत्यार) व कोयता नसलेलं आगरी घर मिळणं अशक्य. आगरी बायकांचाही तोरा काही कमी नसे, तसा तो आजही जपलेला दिसतोच!

‘आमी आगरी बायका, जरा निटूस ऐका.

आमचा नेसना एकदम सोपा,

आमचे केसान फुलांचा खोपा,

आमी आगरी बायका..

आमी जातून खाजना खारी,

आमी करतून शेती वारी,

आमी आगरी बायका..’

गुढघ्यापर्यंत नेसलेली साडी, अंगात चोळी, नाकात नथ असे. कानात ‘पेरे’ हा एक वैशिष्टय़पूर्ण दागिना घातला जाई. त्याचा आकार गोल, काहीसा मोठा व जाडसर आणि सुदर्शन चक्रासारखा असे. शेती, मिठागरात ऊन-पावसापासून सुरक्षित राहण्यासाठी त्या डोक्यावर ‘खोपा’ घालत. जाड घोंगडीपासून तयार केलेला हा खोपा तिचे निसर्गाच्या सर्व लहरींपासून संरक्षण करत असे. आजही पेण, वडखळ, अलिबाग, कर्जत, नेरळ इत्यादी भागांत हा खोपा पाहायला मिळतो.

सोन्याचे वेड ‘विसरून जाते ती तिच्या सुख-दु:खाला, सासर-माहेर एक होतं, जेव्हा सणासुदीला.’

सण-समारंभ म्हणजे आगरी समाजात उत्साहाचं उधाण. सोन्याच्या दागिन्यांची या समाजाला प्रचंड आवड. जी काही जमापुंजी साचेल त्यात जास्तीत जास्त दागिने घडविणे हा जणू काही छंदच. आजही हा छंद मोठय़ा हौसेने जपण्यात येत आहे. बोरमाळ, पुतळ्यांची माळ, पाचू वज्राठी, ठुशी असे स्वर्णालंकार घरात असणे म्हणजे श्रीमंती.

चापूनचोपून नेसलेली भडक रंगाची साडी आणि शक्य तेवढे दागिने अंगावर परिधान करण्याची मोठी आवड. या सुवर्णप्रेमाचा विसर आजच्या पिढीलाही पडलेला नाही. आजही आगरी स्त्रिया सोन्यात मढलेल्या दिसतात.