13 December 2019

News Flash

आगरी कोळी भवनातील ‘संस्कृती’ कागदावरच

आठ वर्षांनंतरही सिडकोचे दुर्लक्ष; प्रशस्त मजला धूळखात

|| संतोष जाधव

आठ वर्षांनंतरही सिडकोचे दुर्लक्ष; प्रशस्त मजला धूळखात

नवी मुंबईतील मूळ आगरी-कोळी संस्कृती जोपासली जावी यासाठी नेरुळे येथे आठ वर्षांपूर्वी (१३ ऑगस्ट २०११) रोजी मोठा गाजावाजा करीत आगरी-कोळी भवनचे उद्घाटन करण्यात आले. या इमारतीचा एक मजला खास नियोजित करण्यात आला होता. मात्र आठ वर्षांनंतरही हा मजला धूळखात पडलेला आहे.

वाशी ते पनवेल तसेच ठाणे-बेलापूर पट्टय़ातील नवी मुंबईत मोठय़ा प्रमाणात मूळ आगरी समाजाची लोकवस्ती आहे. नवी मुंबई शहराच्या निर्मिती याच समाजाच्या जमिनीवर झाली आहे. त्यामुळे भूमिपुत्रांच्या संस्कृतीची ओळख राहावी यासाठी सिडकोने नेरुळ येथे पामबीच मार्गालगत आगरी-कोळी संस्कृती भवनाची निर्मिती केली. या प्रशस्त वास्तूमध्ये तळमजल्यावर वाहनतळ तसेच लग्नसमारंभासाठी जेवणाची व्यवस्था व कार्यालय आहे. तिसऱ्या मजल्यावर ५०० आसनक्षमता असलेले प्रशस्त सभागृह तर दुसऱ्या मजल्यावर लग्न कार्यालय आहे. या इमारतीचा पहिला मजला हा खास आगरी-कोळी संस्कृती जपण्यासाठी ठेवण्यात आला. येथे या समाजाची वापरात आलेली हत्यारे, शेतीसाठीची अवजारे, मासेमारीसाठी लागणारी जाळी, शेती व वापराच्या विविध वस्तू यांचे संग्रहालय तसेच आगरी कोळी साहित्यासाठी ग्रंथालय नियोजित करण्यात आले होते. परंतु सिडकोने याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे इमारत उभी राहिली पण मूळ प्रस्ताव अद्याप कागदावरच दिसत आहे. सिडकोचे अध्यक्ष, आमदार , नवी मुंबई व पनवेल महापालिकेतील अनेक लोकप्रतिनिधी या समाजाचे आहेत. परंतु भवनातील संस्कृती निर्मितीकडे दुर्लक्ष होत आहे. लोकप्रतिनिधी गप्प का असा सवाल उपस्थित केला जात आहे. नगरसेवक व माजी सिडको संचालक नामदेव भगत यांनी याबाबत पत्रव्यवहार करूनही सिडकोने ठोस कार्यवाही केलेली नाही. याबाबत सिडकोचे एस.के.चौटालिया यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

नेरुळ येथे आगरी कोळी समाजाच्या संस्कृतीसाठी आगरी-कोळी भवनात संस्कृती जोपासण्याचे प्रयोजन असताना सिडकोमार्फत दुर्लक्ष करण्यात येत असेल तर याबाबत चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. अधिकाऱ्यांशी चर्चा करून वस्तूसंग्रहालय व ग्रंथालय तयार करण्यात येईल.   – प्रशांत ठाकूर, अध्यक्ष ,सिडको.

First Published on August 14, 2019 12:40 am

Web Title: agri koli sanskruti bhavan mpg 94
Just Now!
X