उरणमध्ये ऊस तसेच जर्मन झेंडूच्या चाकोरीबाहेरील पिकांचे यशस्वी उत्पादन

उरण तसा खाडीकिनाऱ्यावरील परिसर असून या विभागात केवळ पावसावर आधारित भातशेती केली जात असली तरी काही भागांतील शेतकरी भाजी, फुले, नारळी यांचीही पिके घेतात. तर अनेक शेतकरी आपल्या शेतीत विविध प्रकारची उत्पादने घेण्याचे प्रयोग करीत आहे. यात चिरनेरमधील एका शेतकऱ्याने वातावरण तसेच हवामानाच्या विपरीत असे ऊसाचे पीक घेऊन हा प्रयोग यशस्वी केला आहे. तर नागाव येथील शेतकऱ्याने झेंडूला पर्याय म्हणून अधिक नफा देणाऱ्या जर्मन जातीच्या झेंडूची किफायतशीर शेती केली आहे. मात्र या दोन्ही शेतकऱ्यांना शासनाकडून तसेच कृषी विभागाकडून प्रोत्साहन देण्यासाठी इतरही अंतर्गत पिके घेण्याची अट असल्याने हे शेतकरी प्रयोगशील शेतीपासून मिळालेल्या यशाच्या कौतुकापासून वंचित आहेत.

चिरनेर हा परिसर शेती करण्याचा असून या भागात विविध प्रकारच्या भाज्यांचे तसेच वालाच्या शेंगांचे मोठय़ा प्रमाणात पीक घेतले जाते; परंतु चिरनेरमधील शेतकरी किसन गोंधळी यांनी या पारंपरिक शेतीला छेद देताना पश्चिम महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात उत्पादित केला जाणारा ऊस पिकवला आहे. यासाठी त्यांना पश्चिम महाराष्ट्रातील त्यांच्या एका शिक्षक मित्राने उसाचे पीक कसे घ्यायचे यासंबंधीच्या सूचना आणि त्यासाठी लागणारे बियाणेदेखील आणून दिले. त्याच्या या निर्णयामुळे नाक्यावरील उसाच्या विक्री व्यवसायाला मोठा हातभार लागला असून बाहेरून ऊस खरेदी करण्यापेक्षा स्वत:च्या दीड एकराच्या शेतातून उसाची लागवड केल्याने वर्षांला दोन ते अडीच लाखांचे उत्पन्न मिळविण्यात त्यांना यश आले आहे. यासाठी त्यांनी शेतात पाण्याची व्यवस्था म्हणून एक तलावही खोदला असून त्यासाठी पन्नास हजारांचा खर्च झाला आहे.

तर नागावमधील शेतकऱ्यानेही झेंडूच्या पिकाला पर्याय म्हणून जर्मन झेंडूचे पीक घेऊन नवा प्रयोग यशस्वीपणे साकारला आहे. या दोन्ही शेतकऱ्यांची माहिती उरणच्या कृषी विभागाला असूनही त्यांची दखल घेतलेली नाही.

या दोन्ही शेतकऱ्यांना शासनाकडून तसेच कृषी विभागाकडून प्रोत्साहन देण्यासाठी इतरही अंतर्गत पिके घेण्याची अट असल्याने कृषी विभागाकडून काहीच करता येत नाही. त्यामुळे प्रयोगशील शेतीकडे शेतकऱ्यांना वळविण्यासाठी प्रशासकीय नियमांमध्ये बदल होणे गरजेचे आहे.

के. एस. वसावे, तालुका अधिकारी, कृषी विभाग