पूनम धनावडे, नवी मुंबई

नवी मुंबई, ठाणे, मुंबईतून केरळ भवनात अन्नधान्य, कपडय़ांचे संकलन

केरळमधील पूरग्रस्तांसाठी नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे परिसरातून मदतीचा ओघ वाहू लागला आहे. विविध भागांतील नागरिकांनी पाठवलेले अन्नधान्य, कपडे, पिण्याचे पाणी गेल्या तीन दिवसांपासून वाशीतील केरळ भवनात संकलित करण्यात येत आहे आणि तेथून केरळला पाठवण्यात येत आहे.

केरळमधील पुराने तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेकांना निवारा शिबिरांत राहावे लागत आहे. अन्न-वस्त्रासारख्या मूलभूत सुविधांपासूनही अनेक पूरग्रस्त वंचित आहेत. त्यांच्या मदतीसाठी नवी मुंबई, मुंबई, ठाण्यातील नागरिकांनी पाठविलेले साहित्य केरळ भवनात संकलित करण्यात आले आहे.

संकलित करण्यात आलेल्या साहित्यात अन्नधान्य, कडधान्य, तांदूळ, पिण्याच्या पाण्याच्या छोटय़ा बाटल्या, कपडे, बिस्किटे अशा महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे.

अतिवृष्टीमुळे केरळकडे जाणारे मार्ग बंद झाल्याने जहाजाने ३७ ट्रक अन्नधान्य, पाणी पाठविण्यात आले आहे. एका ट्रकमध्ये १५ टन धान्य याप्रमाणे सुमारे ५५५ टन धान्य केरळला पाठवण्यात आले आहे. रविवारी ५ ते ६ ट्रक महामार्गावरून पाठविण्यात आले.

सोमवारी ४० टन धान्य पाठविण्यात आले असून पुढील कालावधीत ७ ते ८ ट्रक धान्य पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी गेले तीन दिवस १००हून अधिक नागरिक २४ झटत आहेत.

संस्थांकडून आर्थिक मदत

नवी मुंबई, मुंबई, ठाणे येथील विविध संस्थांनी लाखो रुपयांची मदत दिली आहे. नवी मुंबई शहरातील केरळी संस्थांनी आर्थिक मदत केली आहे. त्यातून सुमारे १० ते  १५ कोटींची आर्थिक मदत करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

सिटू’कडून एक लाख रुपयांची मदत

केरळमधील पूरग्रस्तांना ‘सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स’च्या (सिटू) रायगड जिल्हा विभागातील कामगारांच्या निधीतून एक लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. संघटनेच्या अन्य जिल्हा विभागांकडूनही मदत करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्य़ात आलेल्या पुराच्या काळात केरळमधील कामगारांनी लाखो रुपयांची मदत केली होती. गुजरात व महाराष्ट्रातील भूकंपांनंतरही देशभरातील सर्व कामगारांनी मदतीचा हात पुढे केलेला होता. त्यामुळे रायगड जिल्ह्य़ातील जेएनपीटी परिसरातील, येथील गोदामांतील व विविध कंपन्यांतील कामगारांनी पूरग्रस्तांसाठी निधी संकलित केला आहे, अशी माहिती सिटूचे नेते व महाराष्ट्र सचिव भूषण पाटील यांनी दिली.

नवी मुंबईस आजूबाजूच्या शहरांतून केरळमधील पूरग्रस्तांसाठी मदतीचे हात पुढे आले आहेत. केरळ भवनातून ही मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे.

– जय प्रकाश, सदस्य, केरळ भवन