News Flash

विमानतळाजवळ ‘हवाई शहर’

 विमानतळ कामाबरोबरच या नव निर्मितीचे नियोजन सिडकोने सुरू केले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

विकास महाडिक

दिल्लीप्रमाणेच नवी मुंबईतही ‘एरोसिटी’; सिडकोकडून लवकरच सल्लागाराची नियुक्ती

दिल्ली विमानतळ आणि मेट्रो यांना संलग्न ‘एरोसिटी’प्रमाणे नवी मुंबई विमानतळाजवळील ६० हेक्टर जमिनीवर सिडको अद्ययावत हवाई शहर (एरो सिटी) उभारणार आहे.

विमानतळ कामाबरोबरच या नव निर्मितीचे नियोजन सिडकोने सुरू केले आहे. यासाठी लवकरच सल्लागार नेमले जाणार आहेत. विमान प्रवाशांचा प्रवास खरेदी व निवास एकाच ठिकाणी असावा या दृष्टीने ही पंचताराकिंत हॉटेल आणि मॉल्स ने व्यापलेली नगरी असेल. लिलाव पद्धतीने या ठिकाणी सिडको भूखंड विकणार आहे. विमानतळाशी संलग्न असलेल्या अनेक सेवा सिडको या परिसरात उभारण्याचा प्रयत्न करीत असून हवाई शहर (अ‍ॅरोसिटी) हा त्यातील एक प्रयत्न आहे.

मुंबई विमानतळावर मोठय़ा प्रमाणात वाढलेला प्रवासी ताण कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने पनवेल कोपरसारख्या ग्रामीण भागात ‘हरित’ विमानतळ उभारले जात आहे. १६ हजार कोटी आणि सुमारे दोन हजार हेक्टर जमिनीवरील या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या चारही बाजूने विकास होणार आहे. हा विकास शास्त्रोक्त व नियोजनबद्ध व्हावा यासाठी सिडको एक मास्टर प्लॅन तयार करीत आहे. त्यात येथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. राज्यातील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुंबईशी सलंग्नता वाढावी यासाठी न्हावा शेवा शिवडी सागरी सेतूचेही काम सुरूआहे. त्यामुळे केवळ २२ मिनिटांत नवी मुंबई गाठता येणार आहे.

सिडकोने विमानतळाच्या आजूबाजूला काही प्रकल्पांचे आरक्षण जाहीर केले आहे. हा भाग सिडको संपादित करणार नाही, पण या नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्राचे नियोजन सिडको करणार आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांसह अत्यावश्यक सेवांचे नियोजन सिडको करणार असून यात शिक्षण, वैद्यकिय सेवा सारख्या एखाद्या संकल्पनेवर आधारीत वेगळी नगरी उभारली जाणार आहे.

याच नगरीच्या बाजूला दिल्ली विमानतळ बाहेर उभारण्यात आलेल्या अ‍ॅरोसिटी प्रकल्पही उभारला जाणार असून सिडकोने त्याचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकाच्या आदेशाने व्हिडीओकॉनला सिडकोने १०० हेक्टर जमीन एलईडी प्रकल्पासाठी दिली होती मात्र या प्रकल्पासाठी लागणारे अनुदान कंपनी विहित कालावधीत उभी करुन न शकल्याने सिडकोने ही जमीन परत घेतली. त्यामुळे ही जमिन व्हिडीओकॉनच्या एलईडी प्रकल्पाला न जाता शिल्लक राहिली आहे. त्यातील ६० हेक्टर जमिनीवर हा अ‍ॅरोसिटी प्रकल्प उभारण्याचे सिडकोने ठरविले आहे.

यातील भूखंड पंचताराकिंत हॉटेल साठी लिलाव पध्दतीने जाहीर केले जाणार आहेत. याशिवाय प्रवाशांच्या खरेदी साठी मॉल्स उभारणीलाही परवानगी दिली जाणार आहे. दिल्ली विमानतळा बाहेर १७ पंचताराकिंत हॉटेल्स आहेत. या हॉटेल्स मधून काही मिनिटातच प्रवाशी विमानतळ गाठू शकणार आहे. याशिवाय शहरात जाण्यासाठी दिल्ली मेट्रो या अ‍ॅरोसिटीला जोडण्यात आली आहे. सिडकोची नवी मुंबई मेट्रो पुढील वर्षी धडधडणार आहे. तिची प्रवास खांदेश्ववर हून नवी मुंबई विमानतळाला होणार आहे. हीच मेट्रो पुढे या अ‍ॅरोसिटीला देखील जोडली जाणार आहे. विमानतळ, मेट्रो, रेल्वे, कॉर्पोरेट पार्क नंतर सिडकोचा हा पाचवा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.

सिडकोचा नवी मुंबई विमानतळ प्रकल्प हा या भागाचा कायापालट करणारा ठरणार आहे. त्यामुळे विमानतळाच्या जवळ दिल्ली विमानतळाप्रमाणे काही सुविद्यांची आवश्यकता असून त्यांचे नियोजन सुरु करण्यात आले आहे. त्यात एरोसिटी हा ६० हेक्टर जमिनीवरील एक प्रकल्प आहे.

– लोकेश चंद्र, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 1:02 am

Web Title: air city near airport
Next Stories
1 वीजवापराचा तपशील थेट ऑनलाइन
2 विजेच्या धक्क्याने फ्लेमिंगोचा मृत्यू
3 ‘सेझ’मधून सव्वा लाख रोजगारनिर्मिती – गडकरी
Just Now!
X