12 November 2019

News Flash

औद्योगिक वसाहतीसह दगडखाणींमुळे शहर प्रदूषित

राष्ट्रीय हरित लवादाच्या यादीत नवी मुंबईचा समावेश

पर्यावरणतज्ज्ञांचे मत; राष्ट्रीय हरित लवादाच्या यादीत नवी मुंबईचा समावेश

नवी मुंबईच्या पूर्व बाजूस असलेल्या काही दगडखाणी, शीव-पनवेल, ठाणे-बेलापूर महामार्ग आणि जेएनपीटीकडे जाणारा आम्रमार्ग व टीटीसी औद्योगिक वसाहत हे तीन घटक महामुंबई क्षेत्रातील प्रदूषणाची पातळी उंचावण्यासाठी कारणीभूत असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे मत आहे. यापूर्वीही राज्य पर्यावरण विभागाने नवी मुंबई हे प्रदूषणकारी शहर असल्याचे स्पष्ट केले होते. नवी मुंबई विमानतळाचे उलवा टेकडीची उंची कमी करण्याचे काम हे या प्रदूषणकारी शहरात भर घालणारे ठरले आहे.

राष्ट्रीय हरित लवादाच्या प्रदूषण नियमन मंडळाने नुकतीच देशातील प्रदूषणकारी राज्यांची यादी जाहीर केली आहे. यात राज्यातील चंद्रपूर, तारापर, डोंबिवली, नाशिक आणि नवी मुंबई या शहरांचा तसेच तालुक्यांचा समावेश आहे. नवी मुंबईच्या उत्तर भागातील औद्योगिक वसाहतीतील अनेक रासायनिक कारखान्यांनी मागील दहा वर्षांत या शहरातून आपला गाशा गुंडाळला आहे. येथील जमिनींना सोन्याचा भाव आल्याने या कारखानदारांनी भूखंड विकून शेजारची राज्ये गाठली आहेत. त्यामुळे नवी मुंबई पालिका क्षेत्रात आता प्रदूषणाचे प्रमाण काही अंशी कमी झाले आहे, पण पावसाळा बघून पावसाळी नाल्यात प्रदूषणयुक्त पाणी सोडणाऱ्या लहान कारखानदारांची संख्या कमी नाही. या कारखान्यांकडे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याची आर्थिक ताकद नाही आणि एकत्रित सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील सहभाग त्यांना परवडणारा नाही. त्यामुळे आजूबाजूच्या पावसाळी नाल्यात प्रदूषणकारी पाणी सोडण्याकडे त्यांचा कल असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पारसिक डोंगरामधून खाडीकडे निघणाऱ्या अनेक नाल्यांत हे प्रदूषणकारी पाणी दिसून येते. हेच कारखानदार हवेतील प्रदूषणाला देखील हातभार लावत असून याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे हेतुपुरस्पर दुर्लक्ष असल्याचा अनुभव आहे. हवा आणि पाण्यातील सर्वाधिक प्रदूषण हे सध्या तळोजा औद्योगिक वसाहतीतील आहे. त्यामुळेच या वसाहतीजवळील कासाडी नदी पूर्ण पणे प्रदूषित झाली असून लवादाने कारखानदारांना दंड ठोठावलेला आहे. तळोजा एमआयडीसीतील ही प्रदूषण पातळी दिवसेंदिवस उंचावत असल्याने नवी मुंबई प्रदूषणामध्ये आघाडीवर आहे. यात नवी मुंबई म्हणजे नवी मुंबईचा दक्षिण भाग अभिप्रेत आहे.

याशिवाय नवी मुंबईत सुरू असलेले काही दगडखाणी ज्यांचे परवाना मुदत संपलेली नाही. ठाणे-बेलापूर मार्ग व शीव-पनवेल राष्ट्रीय मार्गावरील वाहतुकींची वाढती संख्या, जेएनपीटीकडे जाणारे कंटेनर या महामुंबईतील प्रदूषणवाढीला कारणीभूत आहेत. या तीन घटकांबरोबरच दोन वर्षांपासून सुरू झालेले नवी मुंबई विमानतळाचे सपाटीकरण व उलवा टेकडी उंची कमी करण्यासाठी सुरुंग स्फोट हे अलीकडे महामुंबई क्षेत्रात प्रदूषणाची भर घालणारे घटक असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे स्पष्ट मत आहे.

शहरात सुरू असलेली मोठय़ा प्रमाणातील बांधकामे, दगडखाणी, शहराची भौगोलिक रचना, तीन महत्त्वाचे मार्ग, त्यावरील वाहतूक आणि औद्योगिक वसाहत ही प्रमुख कारणे नवी मुंबईतील प्रदूषण पातळी उंचावण्यासाठी कारणीभूत असून हे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वानीच दक्ष राहण्याची आवश्यकता आहे.     – जी. एस. गील, (पर्यावरणतज्ज्ञ) संचालक, अर्बन लॅब.

First Published on July 23, 2019 2:31 am

Web Title: air pollution industrial colonies mpg 94