केंद्राची दुरवस्था; पाठपुरावा करूनही पालिका प्रशासन ढिम्म, कर्मचारी त्रस्त

घटनास्थळी ताबडतोब पोहोचून अत्यावश्यक सुविधा पुरवणाऱ्या अग्निशमन दलाच्या ऐरोली केंद्राची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. या केंद्रातील समस्यांबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही काहीच हालचाली होत नसल्याने कर्मचारी त्रस्त आहेत.

अग्निशमक दल दुर्घटनेत ताबडतोब घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम पार पाडत असते. हे केंद्र सध्या समस्यांच्या विळख्यात सापडलेले आहे. या केंद्राच्या छताचे बांधकाम ठिकठिकाणी कोसळलेल्या अवस्थेत आहे. बांधकाम पडू नये म्हणून त्याला टेकू लावण्यात आलेले आहेत. इमारतीच्या भिंतीला तडे गेलेले आहेत तर काही ठिकाणी विद्युतवाहिन्या लोंबकळलेल्या अवस्थेत आहेत. काही वेळा पाण्याच्या टाक्या भरून वाहतात, तर पाणीपुरवठा करण्याचे पाइप गंजलेले, तुटलेले असून व्हॉल्व्हही खराब आहे. याबाबत तक्रार करूनही काहीच फायदा नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. इमारतीवर पान खाऊन टाकण्यात येणाऱ्या पिचकाऱ्यांमुळे रंगरंगोटी झालेली आहे. गेल्या तीन वर्षांपासून आपतकालीन सुविधेसाठी असलेला मागचा गेट नादुरुस्त आहे, तर मुख्य गेट तुटलेला व गंजलेला आहे. तातडीचा कॉल आल्यानंतर दोघा-तिघांना मिळून गेट खोलावा लागतो. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत त्रेधातिरपिट उडते. या दलाच्या ताफ्यात प्रत्येकी एक फायर इंजिन, मिनी वॉटर टँक, रेस्क्यू, अ‍ॅम्ब्युलन्स, जीप, वॉटर टँकर अशी सामग्री आहे. त्यातील ड्रील टॉवर वापराविना पडून आहे. आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी ११ माणसांचा गट असणे अपेक्षित आहे. मात्र येथे दोन चालक व दोन फायरमॅन उपलब्ध असतात. वारंवार पत्रव्यवहार करूनही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची व्यथा कर्मचाऱ्यांनी मांडली. कर्मचाऱ्यांच्या पगारामधून दहा टक्के  देखभाल खर्च कापला जातो परंतु त्यांच्या राहत्या घराची अवस्था बिकट आहे. घरांचे दरवाजे सडलेल्या अवस्थेत आहेत. केंद्राभोवती असलेले सुरक्षाकुंपण तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे चोरीच्या घटना तसेच गर्दुल्यांचा त्रास कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो. त्यामुळे केंद्राच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पगार सहाव्या वेतनानुसार मात्र, ओव्हर टाइम केल्यावर पाचव्या वेतनानुसार रक्कम मिळते. मेडिक्लेमची सुविधाही नसल्याची व्यथा कर्मचाऱ्यांनी मांडली. याबाबत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी संपर्क होऊ  शकला नाही.

केंद्रात असणाऱ्या समस्यांची स्थिती प्रशासनासमोर मांडली आहे; मात्र त्याची दखल घेतली जात नाही.

एकनाथ पवार, साहाय्यक केंद्र अधिकारी