लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : करोनाकाळात शहरातील आरोग्यव्यवस्थेचे महत्त्व पटल्यानंतर पालिका प्रशासनाने आरोग्यसेवा सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. आतापर्यंत वाशी येथील एकमेव रुग्णालय सार्वजनिक रुग्णालय म्हणून सेवा देत होते. आता माताबाल रुग्णालयांचेही सार्वजनिक रुग्णालयात रूपांतर करण्यात येणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात ऐरोली माताबाल रुग्णालयावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून १ जानेवारीपासून या ठिकाणी अतिदक्षता, शस्त्रक्रिया व औषध या महत्त्वपूर्ण विभागांची भर पडणार आहे.

गुरुवारी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी या रुग्णालयाला अचानक भेट देत याबाबत येथील आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, उपआयुक्त अमरिश पटनिगिरे आणि रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षां राठोड उपस्थित होत्या. यावेळी आयुक्तांनी येथील रुग्णालयीन सुविधांची व इतर आरोग्य सेवांसाठी राखीव ठेवलेल्या उपलब्ध जागांची पाहणी केली. २०१५मध्ये या ठिकाणी मोठी इमारत उभारली आहे. मात्र फक्त बारुग्ण सेवाच उपलब्ध होती. प्रसूती व बालरुग्ण हे दोन विभागच कार्यरत होते, याबाबतही नाराजी व्यक्त केली.

या रुग्णालयाचा पूर्ण क्षमतेने वापर करणे गरजेचे आहे. आवश्यक पायाभूत सुविधा व काही प्रमाणात डॉक्टरही उपलब्ध आहेत. त्यामुळे सध्या पॅनलवर डॉक्टर घेऊन तसेच परिचारिका व इतर आवश्यक मनुष्यबळाचे नियोजन करीत अतिदक्षता, औषध व शस्त्रक्रिया विभाग १ जानेवारीपर्यंत सुरू करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्याबाबतचा कृती आराखडा तयार करून सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

१ नोव्हेंबरपासून या रुग्णालयात बायंत्रणेद्वारे डायलेसीस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र त्याची माहिती नागरिकांना नसल्याने रुग्णांची संख्या अल्प आहे. त्यामुळे याबाबत नागरिकांपर्यंत या सेवेबाबत माहिती पोहचविण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.  तळमजल्यावर ‘पोस्ट कोविड क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहे. याची माहिती नागरिकांना होण्यासाठी दर्शनी भागात फलक लावण्यात यावेत असे आयुक्तांनी सांगितले.

महत्त्वपूर्ण आरोग्य सूचना

  • जास्तीत जास्त आजारांच्या चाचण्या पालिकेच्या प्रयोगशाळेत कराव्यात.
  • नवजात अतिदक्षता कक्षाची क्षमता वाढवावी.
  • नेत्रचिकित्सा विभागात ओपीडीप्रमाणेच आयपीडी देखील सुरू करावी.
  • मोतिबिंदूसारख्या सर्जरी करण्याचे नियोजन करावे.

ऐरोली व नेरुळ रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार केला आहे. दर आठवडय़ाला याबाबत आढावा बैठक घेत कार्यवाही करण्यात येईल. अशा प्रकारच्या रुग्णालयांना अचानक भेटी देत आरोग्यासह इतरही विभागांच्या सेवासुविधांची प्रत्यक्ष वस्तुस्थिती जाणून घेण्यात येईल. त्यामध्ये नागरिकांना अपेक्षित सुधारणा करण्यात येतील.

-अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका