नवी मुंबई : तुर्भे येथील रहिवाशांनी कोणालाही घाबरण्याचे कारण नाही. रात्री-अपरात्री कधीही फोन केल्यास आपण काही मिनिटांत हजर होऊ, आपणास राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगार (भाई) चांगले ओळखतात अशी दर्पोक्ती करणारे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांना त्यांच्या पक्षाच्या श्रेष्ठींनी त्यांची कानउघाडणी केल्याचे समजते.

त्यावर आपण तेथे वाढत असलेल्या भाईगिरीला आळा घालण्यास बोलण्याच्या ओघात बोलल्याचा खुलासा नाईक यांनी पक्षश्रेष्ठींकडे केल्याचे समजते. नाईकांच्या या भाषणावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही त्यांच्या वक्तव्याचा चौकशी करण्याची मागणी केली आहे.

नवी मुंबई पालिकेच्या निवडणूक मार्चमध्ये लागण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्वच पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी संपर्क कार्यालये उघडण्याचा सपाटा लावला आहे. तुर्भे झोपडपट्टीतील एका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करताना भाजपचे नेते आमदार गणेश नाईक यांनी या विभागातील शिवसेनेचे उमेदवार सुरेश कुलकर्णी यांचे नाव न घेता त्यांच्या वाढत्या भाईगिरीच्या विरोधात स्थानिक भाजप कार्यकत्र्यांनी विरोध करावा यासाठी कार्यकत्र्यांना प्रोत्साहान देण्याच्या जोशात आपल्याला देशविदेशातील सर्व भाई ओळखत असून या स्थानिक भाईगिरीला घाबरण्याचे कारण नाही असे वक्तव्य केले. त्या विरोधात जनमत तयार करण्याचे काम महाविकास आघाडीचे नेते करीत असून सुळे यांनी चौकशीची मागणी केली आहे. त्यांच्या या भाषणाची चौकशीची मागणी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे करणार असल्याचे स्पष्ट करून राज्यातील गृह विभागाने चौकशी करण्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे भाजपचे संपर्कप्रमुख आमदार अ‍ॅड. अशीष शेलार यांनी नाईकांकडे या वक्तव्याबद्दल विचारणा केल्याचे समजते. त्या वेळी स्थानिक कार्यकत्र्यांना दहशतीच्या विरोधात बळ देण्यासाठी आपण बोलण्याच्या ओघात हे वक्तव्य केल्याचे त्यांनी सांगितले.