महापौर, पालिका आयुक्तांची भेट घेण्याचा निर्णय

विविध कारणांस्तव गेली पाच वर्षे रखडलेले ऐरोली सेक्टर ५ येथील नाटय़गृह लावकरात लवकर बांधावे, यासाठी नाटय़प्रेमी सरसावले आहेत. ते महिनाअखेर पालिका आयुक्त डॉ. रामस्वामी एन. यांची भेट घेणार आहेत. हे नाटय़गृह उभारण्यासाठी खोदण्यात आलेल्या मोठय़ा खड्डय़ात पावसाळ्यात पाणी साचते. त्यात गतवर्षी एका महिलेने आत्महत्या केली होती. निविदा देऊनही वेळेत काम सुरू न केल्याने पालिकेने कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून नवीन कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

नवी मुंबईची भौगोलिक रचना सरळ रेषेत आहे. लोकसंख्या कमी असली, तरीही क्षेत्रफळ मुंबईएवढेच आहे. येथील सांस्कृतिक गरज भागविण्यासाठी सिडकोने २० वर्षांपूर्वी वाशी सेक्टर १६ येथे विष्णुदास भावे नाटय़गृह बांधले.

हे नाटय़गृह प्रवासाच्या दृष्टीने लांब असल्याने बेलापूर किंवा ऐरोलीतील नाटय़प्रेमी तिथे फारसे फिरकत नाहीत. त्यामुळे काही अपवाद वगळता भावे नाटय़गृहातील आसने नेहमी रिकामीच असतात. अठरा पगड जाती असलेल्या या शहरात मराठी नाटय़प्रेमींची तशी वनवाच आहे. शहरातील नाटय़ चळवळ जिवंत राहावी यासाठी दोन टोकांना छोटी नाटय़गृहे व्हावीत अशी गेल्या अनेक वर्षांपासून नाटय़प्रेमींची मागणी आहे.

ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांच्या प्रस्तावानुसार नाटय़गृहासाठी ऐरोली सेक्टर -१६ येथी १३ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड हस्तांतरित करून घेण्यात आला आहे. त्यावर २०१४मध्ये भूमीपूजनाच्या कार्यक्रमही झाला. मात्र तेव्हापासून या भूखंडावर एक वीटही रचली गेलेली नाही. त्यामुळे ऐरोलीतील नाटय़प्रेमी नाराज आहेत. त्यांना नाटक पाहण्यासाठी मुलुंड किंवा ठाण्याला जावे लागते. त्यामुळे येथील नाटय़गृह लवकर व्हावे यासाठी नाटय़प्रेमी आग्रही आहेत. या ठिकाणी नाटय़कलावंतांची संख्या हे जास्त आहे. अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत नाटय़गृह लवकर व्हावे यासाठी एक चळवळ उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी महापौर जयवंत सुतार आयुक्त डॉ. रामस्वामी यांची २७ मार्च रोजी भेट घेऊन या मुद्दय़ावर चर्चा करण्यात येणार असल्याचे बैठकीला उपस्थित असलेल्या नाटय़प्रेमींनी सांगितले.

नाटय़प्रेमींच्या सूचना

  • नाटय़गृह कमी आसनक्षमतेचे असावे.
  • सध्याच्या ठिकाणी वाहतूक कोंडीची शक्यता लक्षात घेता सेक्टर १० येथे भूखंड नवीन नाटय़गृह बांधावे. बहुमजली वाहनतळ उभारावे
  • नाटय़गृहात ग्रंथालय वाचनालयाची सुविधा असावी
  • दोन तालीम कक्ष असावेत
  • अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेसाठी कार्यालय असावे
  • अपंग व ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्वाहन असावे
  • नाटय़गृहामध्ये सिनेमा दाखवण्याची सोय असावी

ऐरोली नाटय़गृहाचे काम गेली चार वर्षे रखडले आहे. ऐरोली हा विधानसभा मतदारसंघ असल्याने स्वतंत्र नाटय़गृहाची नितांत गरज आहे. या भागात मराठी नाटय़प्रेमी व नाटय़कलावंत जास्त आहेत. त्यामुळे नाटय़गृह लवकर व्हावे अशी अपेक्षा आहे. यासाठीच्या आंदोलनाची पहिली घंटा महापौर व आयुक्तांच्या भेटीने वाजवली जाणार आहे.

संदीप जंगम, सचिव, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद, ऐरोली