आदित्य ठाकरे उपस्थित राहणार; मुंढे यांची बदली होताच जुन्या प्रकल्पांच्या श्रेयासाठी धडपड सुरू

नवी मुंबईकरांसाठी दीड वर्षांपूर्वीच खुल्या करण्यात आलेल्या ऐरोलीतील जपान टेक्नॉलॉजी थीम पार्कचे लोकार्पण येत्या सोमवारी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाच्या काळात विकासकामांच्या उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्यांना कात्री लावत विविध ठिकाणे सर्वसामान्यांसाठी खुली केली होती. त्यामुळे श्रेय मिळवण्याची हुकलेली संधी साधण्याची धडपड नगरसेवकांनी सुरू केली आहे.

तुकाराम मुंढे यांची बदली होताच नवी मुंबईतील लोकप्रतिनिधींनी विकासकामांच्या उद्घाटन आणि लोकार्पणाचा सपाटा लावला आहे. काही दिवसांपूर्वी महापौर सुधाकर सोनवणे आणि विद्यमान आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी खरणे येथील अ‍ॅम्युझमेंट पार्कचे लोकार्पण केले. त्यापाठोपाठ आता शिवसेनाही सरसावली आहे. ऐरोलीतील शिवसेनेचे नगरसेवक एम. के. मढवी यांच्या प्रभागातील जपान टेक्नॉलाजी थीमपार्कचे लोकार्पण येत्या सोमवारी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे आणि महापौर सुधाकर सोनवणे उपस्थित राहणार आहेत. मुळात हे उद्यान दीड वर्षांपूर्वीच मुंढे यांनी नागरिकांसाठी खुले केले होते. मुंढे यांनी याच उद्यानात ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रम देखील राबवला होता. दीड वर्षांपासून वापरात आलेल्या या थीमपार्कमधील जपानी पद्धतीच्या स्तुपस्तंभांचा आणि मूर्तीचा रंग आता उडला आहे. खेळाच्या साहित्याची मोडतोड झाली आहे. प्रवेशद्वारावरील फलकातील अनेक अक्षरे गळून पडली आहेत. अशा स्थितीतील दीड वर्षे वापरलेल्या ठिकाणाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आल्यामुळे ऐरोलीतील रहिवासी आश्चर्य व्यक्त करत आहेत. सोहळ्याचे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत आणि सध्या ठेकेदाराची कानउघाडणी करत रंगरंगोटीचे काम घाईगडबडीने सुरू करण्यात आले आहे.

पक्षश्रेष्ठींना खूश करण्यासाठी?

मुंढे यांनी विकासकामांच्या लोकार्पण सोहळयांना हरकत घेत, लोकप्रतिनिधींच्या प्रसिद्धीलोलूप वृत्तीला चाप लावला होता. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत नवी मुंबईकरांनी केले होते, मात्र मुंढे यांच्या बदलीनंतर पुन्हा विकासकामांचे उद्घाटन सोहळे रंगू लागले आहेत. पदपथांपासून हायमास्ट दिव्यांपर्यंत विविध लहान-मोठय़ा कामांची उद्घाटने सुरू झाली आहेत. आपापल्या पक्षश्रेष्ठींना खूश करण्यासाठी ही क्लृप्ती वापरली जात असल्याची चर्चा रहिवासी करत आहेत.