ऐरोली टोलनाका ते महापेपर्यंत रस्त्यावर वाहतूक कोंडी

ऐरोली टोल नाका मार्गे महापेकडे शनिवारी मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे ऐरोली टोल नाका ते महापेपर्यंतच्या रस्त्यावरील पंधरा मिनिटांच्या प्रवासासाठी दोन तासापेक्षा अधिक  वेळ लागत होता. त्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

पावसामुळे मुंब्रा पुलावर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पुलाच्या डागडुजीचे काम करण्यात येणार असल्याने शुक्रवारी रात्री १० वाजल्यापासून शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत खारेगाव टोल नाक्यावरून मुंब्रा मार्गे पनवेलकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना खारेगाव टोल नाका येथून प्रवेश निषिद्ध करण्यात आला होता. त्यामुळे पनेवल जेएनपीटीकडे जाणारी अवजड वाहनेही कोपरी ब्रिज मार्गे आनंदनगर चेक नाका येथून ऐरोली टोल नाक्यावरून महापेकडे वळवण्यात आली होती.

अवजड वाहने ऐरोली टोल नाक्या मार्गे वळवण्यात आल्याने ऐरोली टोल नाका ते महापेपर्यंतच्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लाब रांगा लागल्या होत्या. अवघ्या पंधरा मिनिटांच्या असणाऱ्या या प्रवासासाठी दोन तासापेक्षा अधिक वेळ लागत असल्याने वाहनचालक संतापले होते. दुसरा शनिवार व रविवार सलग शासकीय सुट्टीचा दिवस असल्याने फिरण्यासाठी बाहेर निघलेले प्रवासी हे वाहनात ताटकळत बसून राहावे लागल्याने वैतागले होते.

तर नवी मुंबईतील खासगी कंपन्यांमध्ये येणारे नोकरदार  हे वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याने कामावर उशिरा पोहचले. वाशी टोल नाका ते महापेपर्यंतच्या असणाऱ्या रस्त्यावरील सिग्नल वापर देखील बंद करण्यात आला होता. बिनधास्तपणे  सिग्नल तोडत असल्याचे निर्दशनास आले होते.

मुंब्रा पुलाचे काम सुरु असल्यामुळे खारेगाव माग्रे पनवेल कडे जाणारी अवजड वाहने ही नवी मुंबईतील  ऐरोली टोल नाक्यावरुन महापे कडे वळवण्यात आली होती. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुक कोंडी झाली आहे.

– रामचंद्र घाडगे, वाहतुक पोलीस निरीक्षक महापे