विकास महाडिक

१० किलोमीटर परिसरात २८७ प्रजातींचे पक्षी असल्याचे ‘बीएनएचएस’च्या सर्वेक्षणात स्पष्ट

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या १० किलोमीटर परिसरात विविध प्रकारचे २८७ देशी-विदेशी पक्षी वर्षभर संचार करीत असल्याचे ‘द बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ने (बीएनएचएस) केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पाणथळ भाग आणि पाण्याचे स्रोत, बुजवणे किंवा वळविण्याचा फेरविचार करावा लागणार आहे. पाणथळी आणि जलस्रोत हे नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच एका जनहित याचिकेत स्पष्ट केले आहे. त्यामुळे विमानउड्डाणात अडथळे येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

नवी मुंबईतील विमानतळासाठी एकूण २२६८ हेक्टर जमीन आवश्यक आहे. सिडकोने १० गावांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या उलवा टेकडीची उंची कमी करणे, खाडीचा या क्षेत्रातील प्रवाह बदलणे, उच्च दाबाच्या वाहिन्या भूमिगत करणे आणि धावपट्टीसाठी सपाटीकरण अशी कामे सुरू आहेत. विमानतळासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या विविध परवानग्या घेणे भाग पडले आहे. जैवविविधता, वन, खारफुटी इत्यादी ना हरकत प्रमाणपत्रे सप्टेंबर २०१६ मध्ये घेण्यात आली आहेत. या विमानतळाचा कर्नाळा अभयारण्यातील वन्यजीवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचा अभ्यास उपाययोजना करण्याची हमी सिडकोने दिली आहे. विमानतळाच्या दहा किलोमीटर परिघातात सुमारे २८७ प्रकारचे छोटे-मोठे देशी-विदेशी पक्षी संचार करीत असल्याचे बीएनएचएसने डिसेंबर २०११ पासून केलेल्या सर्वेक्षणात आढळले आहे. विमानांचा आवाज या पक्ष्यांना त्रासदायक ठरणार आहे. उलवा खाडीचा प्रवाह बदलल्यानंतर, पाणथळी बुजवल्यानंतर आणि टेकडीची उंची कमी केल्यानंतर पक्ष्यांची संख्या कमी होईल, असे अहवालात नमूद आहे.

विमानाच्या उड्डाणात या भागातील मोठय़ा पक्ष्यांचा अडथळा येणार आहे. नवी मुंबईतील पामबीच मार्गावरील प्रस्तावित गोल्फ कोर्सला विरोध करताना मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका जनहित याचिकेवरील सुनावणीत विमानतळासाठी पाणथळीच्या जागा तसेच पाण्याचे स्रोत बुजवणे हा नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर घाला असल्याचे स्पष्ट केले आहे. विमानतळासाठी तर हजारो हेक्टर जमिनीवरील पाणथळी बुजवण्यात येत आहेत. न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजाणी केल्यास उड्डाणावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. न्यायालयाच्या आदेशांचे पालन करायचे तर पक्ष्यांचे अधिवास बुजवणे त्यांचे स्थलांतर करणे अशक्य आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे विमानतळ प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता आहे.

विमानतळामुळे पक्ष्यांच्या हक्काच्या जागांवर गदा येणार आहे. यासाठी खूप मोठय़ा प्रमाणात पाणथळीच्या जमिनी बुजवल्या जात आहेत. त्याचा परिणाम यंदाच्या पावसात दिसून आला. दोन-तीन गावे पाण्याखाली गेली. भरावामुळे पक्ष्यांचे अधिवास नष्ट होत आहेत. विमानतळ होणे गरजेचे असल्याचा दावा केला जातो, पण पक्ष्यांचा विचार कोणीच करत नाही. त्यांच्या घरांवर आपली स्वप्ने उभी राहात आहेत.

– नरेंशचंद्र सिंग, अभिव्यक्ती, पर्यावरण संस्था, खारघर

पामबीच मार्गावरील गोल्फ कोर्ससाठी पाणथळी बुजविण्यास न्यायालयाने विरोध दर्शवला आहे, विमानतळ प्रकल्पातील पाणथळींच्या संरक्षणाच्या अटी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने घातल्या आहेत. गोल्फ कोर्स हा पूर्णपणे व्यवसायिक हेतूने उभारला जात आहे. विमानतळ ही देशाची गरज आहे. नवी मुंबईचे पर्यावरण टिकणे आवश्यक आहे. पाणथळीच्या बुजविण्यास न्यायायलयाने केलेला मज्जाव योग्य आहे.

– दिनकर सामंत, ज्येष्ठ वास्तुविशारद