विमानतळाच्या भूमिपूजनामुळे महामुंबईतील घरांच्या किमती १० टक्क्यांनी वाढण्याची चिन्हे

केवळ विमानतळ होणार या जाहिरातबाजीने गेली अनेक वर्षे महामुंबई क्षेत्रातील गृहनिर्मितीवर गारुड घालणाऱ्या बांधकाम क्षेत्राला नवी मुंबई विमानतळाच्या भूमिपूजनाने नवसंजीवनी मिळणार आहे. घरांचे दर दहा टक्क्यांनी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बांधकाम क्षेत्रातील मंदीनंतरही ही तेजी महामुंबई क्षेत्राला प्रेरणा देणारी ठरणार असल्याचे अनेक विकासकांचे मत आहे. आता डिसेंबर २०१९ ला विमानतळावरून पहिले उड्डाण होईल अशी जाहिरातबाजी करून घरांची विक्री केली जाणार आहे.

१६ हजार कोटी रुपये खर्चाच्या नवी मुंबई विमानतळाच्या कामाला रविवारी खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. त्यापूर्वी गेल्या वर्षी दोन हजार कोटी रुपये खर्चाच्या विमानतळपूर्व कामांना सुरुवात झाली आहे. दिलेल्या मुदतीत निविदाकारांनी कामे करावीत यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. विमानतळाच्या कामांत भराव टाकून सपाटीकरण, त्यावरील सिमेंट काँक्रिटीकरणाच्या धावपट्टय़ा आणि कंट्रोल इमारत इतकीचे बांधकाम अपेक्षित असल्याने येत्या २२ महिन्यांत या विमानतळावरून पहिले उड्डाण होण्याची शक्यता आहे. ते मालवाहू की प्रवासी विमानाचे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र जेएनपीटी बंदर जवळ असल्याने हे मालवाहू विमानांचे उड्डाण प्रथम होणार हे स्पष्ट आहे. केवळ विमानतळ होणार या जाहिरातबाजीने येथील विकासकांनी घरांचे भाव १०० पटीने वाढविले होते. यात सिडकोच्या भूखंडांनाही चांगला भाव आला होता. आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाल्याने ही दरवाढ निश्चित आहे. सध्या बांधकाम क्षेत्रात आर्थिक मंदीचे सावट आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या योजना, बक्षीस कमी दर करून घर विकणाऱ्या विकासकांनी पुन्हा कमी केलेली दरवाढ करण्यासाठी कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या भूमिपूजनाने या महामुंबई क्षेत्रात दहा टक्के दरवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विमानतळ भूमिपूजनाने केवळ महामुंबई क्षेत्राची प्रगती होणार नसून पुणे, पेण, खोपोली या भागांचाही विकास होण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूमिपूजन समारंभाने येथील विकासकांमध्ये उत्साह आला आहे. गेले अनेक महिने बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे विकासकांत मरगळ आली होती. ती या समारंभामुळे दूर झाली आहे. येत्या काळात खूप मोठय़ा प्रमाणात गृहनिर्मिती होणार असून परवडणारी घरे जास्त असतील. भूमिपूजनामुळे दहा टक्के दरवाढ करण्यास विकासक मोकळे झाले आहेत. नवी मुंबईला चांगले भवितव्य आहे.

– भूपेन शाह, सल्लागार, नवी मुंबई बिल्डर असोशिएशन, नवी मुंबई