सुटकेनंतर आंदोलकांचा ‘एनआरआय’ पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

उरण : नवी मुंबई विमानतळबाधितांचे पुनर्वसन करा यामध्ये मच्छीमारांचे गाव असलेल्या वाघिवली ग्रामस्थांनी मंगळवारी आपल्या गावाशेजारी सुरू असलेल्या विमानतळाचे काम बंद करण्याचा प्रयत्न केला. या वेळी नवी मुंबईतील एनआरआय पोलिसांनी ग्रामस्थांवर कारवाई करीत त्यांना अटक केली. वाघिवली गाव हे मासेमारी करणारे गाव असून येथील मच्छीमारांचे योग्य ते पुनर्वसन आणि भरपाईची मागणी पूर्ण होईपर्यंत काम करू नये असा ठराव प्रजासत्ताकदिनी ग्रामपंचायतीने केला असतानाही हे काम सुरू करण्यात आले होते. आंदोलनात महिलांचाही मोठय़ा समावेश होता. यापूर्वी विमानतळबाधितांनी सिडकोच्या विरोधात ३९ दिवसांचे महामुक्काम आंदोलन केले होते. त्यानंतर प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला होता. दरम्यान अटक करण्यात आलेल्या आंदोलकांनी एनआरआय पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांना घरी जाण्याच्या सूचना करूनही ते ऐकले नाहीत. त्यांनी पोलीस ठाण्यासमोर बसून राहण्याचा निर्णय घेतला.

मागणीकडे दुर्लक्ष

सिडकोकडून वारंवार नवी मुंबई विमानतळबाधितांना आश्वासने दिली आहेत. असे असताना त्याची अंमलबजावणी होत नसल्याने प्रकल्पग्रस्तांकडून संताप व्यक्त केला जात आहे. महामुक्काम आंदोलन स्थगित केले जात असताना प्रथम चर्चा करून प्रश्न सोडविण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांकडून करण्यात आलेली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत विमानतळबाधित भागात जोरदार कामे सुरूच ठेवण्यात आलेली होती. ही कामे बंद करून प्रथम प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात यावी, अशी मागणी करीत वाघिवली गावातील ग्रामस्थ एकत्रित झालेले होते. त्यानंतर आलेल्या एनआरआय पोलिसांनी कारवाई करीत प्रकल्पग्रस्तांना ताब्यात घेऊन एनआरआय पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत पोलीस ठाण्यातच प्रकल्पग्रस्त आंदोलन करतील, असा इशारा किसान सभेचे रायगड जिल्हाध्यक्ष रामचंद्र म्हात्रे यांनी दिला आहे.