प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर, उलवा नदी प्रवाह बदल करण्याच्या कामाला वेग

गेली अनेक वर्षे या ना त्या कारणास्तव लांबणीवर पडत चाललेल्या नवी मुंबई विमानतळाच्या दक्षिण बाजूकडील धावपट्टीच्या कामाला येत्या १५ दिवसांत सुरुवात होणार असल्याचे सिडको सूत्रांनी सांगितले. या कामाला आता अधिक विलंब लागू नये, अशी सूचना सिडकोने विमानतळ बांधकाम कंपनीला दिली आहे. मुंबई विमानतळाचा कायापालट करणाऱ्या जीव्हीके कंपनीला हे विमानतल बांधकाम उभारणीचे काम मिळाले असून त्यांनी एल अ‍ॅन्ड टी कंपनीला धावपट्टी, टर्मिनल्स, टॅक्सी वे यांची कामे दिलेली आहेत.

नवी मुंबई विमानतळासाठी एकूण २२६८ हेक्टर जमीन निश्चित करण्यात आली आहे. त्यातील ११६० हेक्टर जमिनीवर प्रत्यक्षात टर्मिनल्स आणि धावपट्टी उभारल्या जाणार आहेत. प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर, उलवा नदीचा प्रवाह बदल, उलवा टेकडीची उंची कमी करणे, उच्च विद्युत दाबाच्या वाहिन्यांचे स्थलांतर अशा अनेक कारणांमुळे हा प्रकल्प गेली अनेक वर्षे रखडत चालला आहे.

दहा गावांचे इतरत्र पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यांना सर्वोत्तम पॅकेज देण्यात आले आहे. दक्षिण आणि उत्तर बाजूस दोन धावपट्टय़ा उभारल्या जाणार असून देशातील पहिले ‘ग्रीन फिल्ड’ विमानतळ असे या विमानतळाचे वैशिष्टय़ असेल. विमान प्रधिकरणाने दक्षिण बाजूस बांधण्यात येणाऱ्या धावपट्टीच्या आड येणारी आणखी एक

टेकडीची उंची कमी करण्याच्या सूचना चार महिन्यांपूर्वी केल्या आहेत. त्यामुळे हे काम वाढल्याने पुढील वर्षी या विमानतळावरून होणारे पहिले उड्डाण काही महिने लांबणीवर गेले आहे.

या प्रकल्पात जमिनीच्या बदल्यात सिडकोचा २६ टक्के हिस्सा असून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीचा ७४ टक्के भाग आहे. त्यामुळे सिडकोने हा प्रकल्प लवकर उभारण्यासाठी कंबर कसली आहे.  त्यामुळे पुढील १५ दिवसांत दक्षिण नवी मुंबई कडील

बाजूस होणाऱ्या धावपट्टीचे कामाला प्रत्यक्षात सुरुवात केली जाणार आहे. उत्तर बाजूस उभारण्यात येणाऱ्या धावपट्टीची इतक्यात आवश्यकता नसल्याने ही धावपट्टी नंतर बांधली जाणार आहे.

कामे अंतिम टप्प्यात

धावपट्टीसाठी आवश्यक असलेले सपाटीकरण, उलवा टेकडीची उंची कमी करणे तसेच नदीचा प्रवाह बदलणे ही कामे अंतिम टप्प्यात आहेत. दोन हजार कोटी रुपये खर्चाची ही कामे सिडको करून  देणार असल्याचे निविदा प्रक्रियेतील प्रमुख अट आहे. या विमानतळाला अडथळा ठरू पाहणाऱ्या दहा गावांपैकी कोल्ही, कोपर, चिंचपाडा, वरचा ओवळा, आणि वाघिवली या गावांतील प्रकल्पग्रस्तांनी स्थलांतर केले असून काही मोजकी घरे अद्याप स्थलांतरीत होणार आहेत. पावसाळा संपल्यामुळे या घरांच्या स्थलांतराचा मार्ग देखील मोकळा झाला आहे.