News Flash

उद्योगविश्व : ‘हिट एक्स्चेंजर’च्या क्षेत्रातील मक्तेदारी

मुंबईतील बालमोहन शाळेत आणि सोमय्या इंजिनीअरिंग महाविद्यालयात पाटकर यांनी शिक्षण घेतले.

उद्योजक : अजय पाटकर, रिलायबल फॅब

लहानपणापासून उद्योजक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या अजय पाटकर यांनी इंजिनीअरिंगची पदवी घेऊन मुंबईत केवळ एक वर्ष नोकरी केल्यानंतर स्वत:च्या उद्योगाचे स्वप्न प्रत्यक्षात आणले. तेल शुद्धीकरण प्रकल्प, औषधनिर्मिती, खतनिर्मिती कंपन्यांसाठी लागणारे हिट एक्स्चेंजर बनविण्यात पाटकर यांचा हातखंडा निर्माण झाला. पानिपतपासून आठ किलोमीटरवर असलेल्या इंडियन ऑइलच्या शुद्धीकरण प्रकल्पातील बहुतेक सर्व हिट एक्स्चेंजर त्यांनी बसविले आहेत.

मुंबईतील बालमोहन शाळेत आणि सोमय्या इंजिनीअरिंग महाविद्यालयात पाटकर यांनी शिक्षण घेतले. मेकॅनिकल इंजिनीअरची पदवी घेतली. वडील काशिनाथ पाटकर हे रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियामध्ये चीफ जनरल मॅनेजर पदावर असल्याने शिक्षणाला घरात फार महत्त्व होते. आपली सर्व भावंडे आपल्यापेक्षा जास्त शिकल्याचे पाटकर अभिमानाने सांगतात. त्यांच्या घरात सर्व जण डॉक्टर झाले आणि अजय पाटकर यांनी मात्र अभियांत्रिकीमध्ये कारकीर्द घडवली.  उद्योजक बनण्याच्या त्यांच्या या महत्त्वाकांक्षेमुळे त्यांचे मित्र गमतीने त्यांना टाटा बिर्ला पाटकर अशी हाक मारत.

अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर अनुभवासाठी त्यांनी ‘गॅनसन्स’ या औषधनिर्मितीसाठी लागणारी यंत्रणा तयार करणाऱ्या कारखान्यात एक वर्षे नोकरी केली. मिळालेल्या अनुभवाच्या शिदोरीवर त्यांनी ‘महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा’च्या ट्रॅक्टरसाठी लागणाऱ्या सुटय़ा भागांच्या निर्मितीचा उद्योग सुरू केला. त्याची सुरुवात वाकोलाजवळील एका छोटय़ा कारखान्यातून करण्यात आली. नोकरी आणि उद्योगातून मिळालेले पैसे घरी देण्याची वेळ कधी पाटकरांवर आली नाही. त्यामुळे त्यांच्या गाठीशी साठ हजारांची पुंजी जमा होती. त्या भांडवलाच्या जोरावर एमआयडीसीकडून त्यांनी एक भूखंड विकत घेतला. तिथे ‘रिलायबल फॅब्रिकेटिंग अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग इंड्रस्ट्रिज कंपनी’ची मुहूर्तमेढ रोवली. त्या वेळी रबाळे येथे कारखाना सुरू करणे जोखमीचे होते. आजूबाजूला शेती, वन्यप्राणी आणि दलदल अशा जागेत पाटकर यांनी पहिला कारखाना सुरू केला.

रशिया, चीन, सिंगापूर येथून अवाढव्य प्रवासी व मालवाहू जहाजे गोव्यात येत तेव्हा हिट एक्स्चेंजर दुरुस्तीसाठी पाटकर यांच्याशिवाय पर्याय नसे. गोव्यात १० वर्षे वास्तव्य केल्याने पाटकर गोव्याच्या प्रेमातच पडले. फिरणे आणि वाहन चालवण्याचे वेड असलेल्या पाटकर कुटुंबाने अर्धेअधिक जग पाहिलेले आहे. पाटकर यांच्या हिट एक्स्चेंजरमधील हातखंडय़ामुळे रिलायन्स, आयओसीएल, आरसीएफ, मोदी अल्कलीज, युरेस्ट्रा, इंडोरामा सिंथेटिक्स, यांसारख्या बडय़ा कंपन्यांत रिलायबल कंपनींचा दबदबा आहे. त्याचमुळे पानिपतपासून आठ किलोमीटर अंतरावर इंडियन ऑइलने आपली रिफायनरी उभी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिली पसंती पाटकर यांच्या रिलायबला देण्यात आली.

रिलायन्सच्या जामनगर येथे पाच किलोमीटर खोल समुद्रात टाकण्यात आलेल्या जेट्टीवर अ‍ॅल्युमिनियम हिट एक्स्चेंजर बसविण्याचे आव्हान पाटकर यांनी पेलले आहे. सर्वसाधारपणे अ‍ॅल्युमिनियममध्ये काम करणे मोठे कसब मानले जाते. देशातील बडय़ा उद्योगांना हिट एक्स्चेंजर देतानाच पाटकर यांनी रशियालाही आपले हे तंत्रज्ञान दिले आहे. पतीला साथ देण्यासाठी अनघा पाटकर यांनीही युनियन बँकेतील कायमस्वरूपी नोकरीला रामराम ठोकून पतीच्या उद्योगाला हातभार लावला. दोन मुलींनी उच्चशिक्षण घेतल्यामुळे त्याही स्थिरस्थावर झाल्या आहेत. आता उद्योगाचा पसारा न वाढवता पाटकर दाम्पत्याने आपला अनुभव इतरांना देण्याचा विचार केला आहे. रबाळे येथील कारखान्यात सरतेशेवटी १०० पेक्षा जास्त कामगार काम करीत होते. कंपनीची उलाढाला काही कोटींमध्ये गेली आहे, पण उत्पादन न करता पाटकर यांनी तंत्रज्ञान पुरवण्याचे काम रबाळे येथील एका नवीन कारखान्यातून सुरू केले आहे.

या क्षेत्रातील त्यांच्या दीर्घ अनुभवामुळे खोल समुद्रात असलेल्या ओएनजीसी अथवा ब्रिटिश गॅसच्या प्लॅण्टवर कोणत्याही क्षणी जाण्यासाठी लागणारा हेलिकॉप्टरचा परवाना पाटकर यांच्याकडे आहे.

हिट एक्स्चेंजर म्हणजे..

रसायने, पेट्रोकेमिकल्स, औषधनिर्मिती, ऑफ शोअर, पोलाद, सिमेंट, न्यूक्लिअर, वाईनरी, खाद्यपदार्थ या उद्योगांना लागणारे बॉयलर व रिअ‍ॅक्टर बनवून देण्याचे काम या कारखान्यात सुरू झाले. या दरम्यान पाटकर यांनी हिट एक्स्चेंजर बनविण्याचा अनुभव मिळवला. घरात गिजरच्या साहाय्याने पाणी तापवले जाते. हे पाणी कॉइलमुळे गरम होते. बडय़ा कारखान्यांतील यंत्रांत ही उष्णता त्यातील टय़ूबमुळे निर्माण होते. त्यासाठी लागणाऱ्या हिट एक्स्चेंजरवर पाटकर यांनी लक्ष केंद्रित केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2017 12:42 am

Web Title: ajay patkar reliable fab heat exchanger business
Next Stories
1 कारवाईनंतर मॉलला उपरती
2 पार्किंग रोखण्यासाठी लोखंडी कुंपण
3 ओखी वादळामुळे मासळीची आवक घटली
Just Now!
X