आकाशगंगा सहकारी गृहनिर्माण संस्था, कोपरखैरणे

आज प्रत्येक गृहनिर्माण संकुलात कडक सुरक्षाव्यवस्था पाळली जाते. प्रत्येक संकुलाच्या सुरक्षेची मदार सीसीटीव्ही आणि रक्षकांवर सोपवली जाते; मात्र ‘आकाशगंगा संकुलात सोसायटीचे सदस्यही त्यावर लक्ष ठेवून असतात.

कोपरखैरणे सेक्टर- २३ मधील ‘आकाशगंगा’मध्ये सुरक्षेला प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. ही गृहनिर्माण संस्था खाडीकिनारी उभी आहे. शांत वातावरण ही इथली खासियत. सकाळी, दुपारी आणि रात्री या शांततेत खंड पडत नाही. वाहनांची वर्दळ, याशिवाय इतर अनेक प्रकारच्या कर्कश आवाजापासून या परिसराला मुक्ती मिळालेली आहे. कल् लोळविरहित या छोटय़ाशा जगात प्रत्येक जण निवांत आहे. शांतता तर आहेच, पण शांततेचं काय, असा कळीचा प्रश्न येथील प्रत्येक रहिवाशाला पडलेला होता. असं शांत राहणं कधी कधी जोखमीचंही ठरू शकतं, याचा गांभीर्याने विचार करणाऱ्या ७४ सदनिकाधारकांनी या संकुलाच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ दोनच रक्षकांवर सोपवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला; परंतु यावर सदस्यांनी नामी उपाय शोधला. त्यासाठी सुरक्षेसाठी स्वत: पुढाकार घेतला. समितीतील ११ सदस्यांना याची जबाबदारी वाटून दिली. यात पार्किंग, सीसीटीव्ही यंत्रणा, कचरा, पाणी, वीज आणि इमारत दुरुस्ती निधी (मेंटेनन्स) या जबाबदाऱ्या देण्यात आल्या.

पार्किंग, मुख्य प्रवेशद्वार आणि प्रत्येक ‘विंग’च्या समोरील जागेत ठिकाणी १२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत; मात्र या सीसीटीव्हींचे नियंत्रण आणि निरीक्षण एकाच कार्यालयात न करता त्याची व्यवस्था रक्षकांच्या चौकीतही करण्यात आली आहे. संकुलातील प्रमुख ठिकाणी प्रत्यक्षात रक्षक असतो आणि त्याला बसल्या जागी विविध ठिकाणच्या हालचाली पाहणे सोयीचे जाते. तशी सोय करून देण्यात आली आहे.

संकुलातील कोणालाही समस्या उद्भवल्यास त्याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. ध्वनिप्रदूषण होऊ  नये वा मर्यादेपक्षा अधिक आवाजामुळे इतर रहिवाशांना त्रास होऊ नये, याकरिता नियमावली तयार करण्यात आली आहे.

विनापरवानगी मोठय़ा आवाजात ‘डॉल्बी’वर संगीत वाजवता येत नाही. संकुलातील एखाद्या सदस्याने दुरुस्तीचे काम काढल्यास त्यातील राडारोडय़ाची व्यवस्था करण्याची सक्ती केली जाते. आवारातील राडारोडा वेळेत न टाकल्यास दंड आकारला जातो. घरातील काम करताना होणाऱ्या आवाजामुळे कोणाला त्रास होणार नाही, यासाठी रात्री आठ वाजेपर्यंत आणि रविवारी दुपारी २ पर्यंत काम करण्याची परवानगी दिली जाते. पाण्याची कमतरता भासू दिली जात नाही. पाणी कमी पडल्यास भूमिगत टाकीतून त्याचा पुरवठा केला जातो.

देशहिताला महत्त्व

२६ जानेवारीला संकुलात ध्वजवंदन होते. त्यानंतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात; मात्र संकुलात या कार्यक्रमांशिवाय ज्येष्ठांनाआपली मते व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ दिले जाते. या वेळी चालू घडामोडींवरील जाणकार व्यक्ती देशहिताबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागृती करतात.

सोसायटीच्या आवारात गतिरोधक

मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संकुलाच्या आवारात पार्किंगमधून वाहने बाहेर काढताना मुख्य ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले आहेत. त्यामुळे आवारात वाहनांचे अपघात होण्याचे प्रकार टळतात.

पूनम धनावडे