खासदारांचे सिडकोला आदेश; प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल नाराजी

नेरुळ रेल्वेस्थानकात वाईन शॉप व सानपाडा स्थानकात रेस्टॉरन्ट व बारला परवानगी दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करीत तत्काळ हे बार व वाईन शॉप सिडकोने सील करावेत. जर ते बंद केले नाहीत तर शिवसेना स्टाईलने बंद करण्यात येतील, असा इशाराही खासदार राजन विचारे यांनी दिला.

रेल्वे स्थनकांत प्रवाशांच्या सुविधांचा अभाव असल्याने विचारे यांनी सिडको व रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा केला. यानंतर झालेल्या बैठकीत त्यांनी त्यांची कानउघडणी केली. सीवूड रेल्वे स्थनकातील मॉलसाठी सिडको व रेल्वे आलिशान सुविधा पुरवत असताना सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांसाठी मात्र स्थानकातील सुविधांची वाणवा असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.  रेल्वे स्थानकातही दर्जेदार सुविधा देण्याचे आदेश देत फैलावर घेतले.

यावेळी सिडकोचे मुख्य रेल्वे प्रकल्प अधिकारी एस.के.चौटालिया, रेल्वेचे अधिकारी विद्याधर मालेगावकर, महापालिकेचे शहर अभियंता सुरेंद्र पाटील, एमएसईबीचे व रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी झालेल्या बैठकीत खासदार विचारे यांनी प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष होत असून सीवूड स्थनकात मॉलसाठी मात्र चांगल्या सुविधा देत असल्याचा आरोप केला. न्यायालयाचा निर्णय असताना या स्थानकात स्वयंचलित एस्कलेटर- उद्वाहकाची सोय नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असून या स्थानकात सुरक्षेबाबतही लक्ष देत नाहीत. त्याचप्रकारे पिण्याची योग्य सुविधा नाही. पार्किंगचा मोठा प्रश्न असून येथे कोणत्याही प्रकारची स्वच्छता व देखरेख ठेवली जात नाही. स्वच्छतागृहांच्या अस्वच्छतेबाबत त्यांनी कानउघडणी केली. स्थानकात उद्वाहक बसविण्याबाबत योग्य निर्णय घेण्याच्या सूचना केल्या. पूर्व दिशेलाही अधिक तिकीट खिडक्या सुरू करण्याचे निर्देश देत प्रथम नागरिकांना व रेल्वेप्रवाशांना सुविधा पुरवा असे आदेश विचारे यांनी दिले. तसेच त्यांनी तुर्भे, जनता मार्केट, सानपाडा दत्तमंदिर, आयकर कॉलनी बेलापूर येथील पादचारी पुलांची पाहणी करीत त्या ठिकाणी वीजव्यवस्था तत्काळ देण्याचे आदेश दिले.

तर सिडको अधिकाऱ्यांवर गुन्हे

सिडकोचा आंधळा कारभार असून स्थानकातील वाईन शॉपबाबत सिडको व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना तत्काळ हे चुकीचे धंदे बंद करण्यात यावेत असे आदेश दिले आहेत. याबाबत नवी मुंबईचे पोलीस आयुक्त यांनाही याबाबत कल्पना देण्यात आली आहे. जर याबाबत कार्यवाही न केल्यास सिडको अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे विचारे यांनी सांगितले.