सर्वपक्षीय नगरसेवक एकवटले, ‘क्रिस्टल हाऊसमध्ये’ बैठक
नवी मुंबई पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे लोकशाहीची पायमल्ली करीत असून लोकप्रतिनिधींना जुमानत नसल्याचा आरोप करीत आयुक्तांविरोधात सर्वपक्षीय नगरसेवक एकटवले आहेत. महापौर सुधाकर सोनावणे यांनी या मोर्चेबांधणीत पुढाकार घेतला आहे. यासंर्दभात गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची एक बैठक ‘क्रिस्टल हाऊस’ मध्ये झाली असून सार्वमत घेण्याचा सल्ला माजी मंत्री गणेश नाईक यांनी दिला आहे. काँग्रेसने या मोर्चेबांधणीला यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचे अर्धे नगरसेवक या लढाईत उतरण्यास तयार असून भाजपने आम्हाला गृहीत धरू नका, असा संदेश दिला आहे.

आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यापासून सुरू झालेल्या नगरसेवक व आयुक्त यांच्यातील संघर्षांत पाच महिन्यानंतर चांगलीच ठिणगी पडली आहे. इतर पक्षाचे नगरसेवक महापौराच्या अपमानाचा मुद्दा घेऊन मैदानात उतरणार आहेत. सभागृहात पहिल्यांदा महापौरांना एकाकी टाकणाऱ्या सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नंतर महापौरांना पाठिंबा देणारे पत्र काढून सोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी आयुक्तांना विविध पातळीवर विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांची एक बैठक माजी मंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी पार पडली.

इतके दिवस या विषयावर मौनव्रत धारण केलेल्या नाईक यांनी सर्व नगरसेवकांचे मत घेण्याचा सल्ला दिला आहे.

विरोधाला विरोध न करता आयुक्तांच्या कार्यप्रणालीला व वृत्तीला विरोध करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. शहरातील १११  नगरसेवकांच याबाबत काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी एक सर्वपक्षीय बैठक लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकवाक्यता व सार्वमत तयार होत नाही तोवर कोणतेही आंदोलन न करण्याचे नगरसेवकांनी ठरविले आहे. महापौराच्या या संघर्ष यात्रेत काँग्रेसच्या दहा नगरसेवकांनी साथ देण्याची तयारी दर्शवली आहे.

काही दिवसापूर्वी याच नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेऊन नागरी कामांबाबत सहकार्य करण्याची विनंती केली होती. त्यावेळी आयुक्तांनी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांना सहकार्य करण्याची भूमिका मांडली. नगरसेवकांना बसण्यास आसनव्यवस्था कमी असताना तयार करून दिली. त्यामुळे संतप्त नगरसेवक शांत होऊन माघारी परतले. यात काही नगरसेविका आयुक्तांवर हल्लाबोल करणार होत्या; मात्र आयुक्तांची भूमिका पाहता त्यांनी तलवार म्यान केली.

शिवसेना, भाजपाचे नगरसेवक सहभागी

शिवसेनेचे काही प्रमुख नेते वगळता अर्धे नगरसेवक या सर्वपक्षीय संर्घष आंदोलनात सहभागी होणार आहेत. भाजपचे नेरुळ व वाशीतील तीन नगरसेवक या आंदोलनाचा हिस्सा बनण्यास तयार आहेत. आम्हाला गृहीत धरण्यात येऊ नये असा संदेश आयुक्तांच्या विरोधात विधानसभेत सर्वप्रथम आवाज उठविणाऱ्या बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी दिला आहे. आपण आयुक्तांच्या एकाधिकारशाहीच्या विरोधात आवाज उठविला त्यावेळी सर्व पक्षांनी आपल्याला एकाकी टाकल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे.