20 November 2017

News Flash

शहरबात-पनवेल : आघाडी, स्वबळाची निवडणूक

पनवेल नगर परिषदेवर रामशेठ ठाकूर आणि त्यांचा मुलगा प्रशांत ठाकूर यांची सत्ता होती.

संतोष सावंत | Updated: May 16, 2017 2:39 AM

पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत बाजी मारण्यासाठी तयार असलेले ४१८ उमेदवारांनी कंबर कसली आहे.

आठवडय़ावर येऊन ठेपलेल्या पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत बाजी मारण्यासाठी तयार असलेले ४१८ उमेदवारांनी कंबर कसली आहे. सामान्य मतदारांना स्वत:कडे खेचण्यासाठी प्रचाराची सर्व साधने वापरण्यावर उमेदवारांनी भर दिला आहे. शेकापने भाजपविरोधात प्रचाराची आघाडी उघडली आहे, तर भाजपने मोदी प्रचाराचे तंत्र अवलंबले आहे. सेना या पालिकेत २५ वर्षांनंतर प्रथमच स्वबळावर लढत आहे.

पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात भारतीय जनता पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष हे एकमेकांविरोधात उभे ठाकले असले तरी प्रत्यक्षात ही लढाई दोन व्यक्तींविरोधातील आहे. महानगरपालिकेतील दोघांचे अस्तित्व ठरवणारी आणि निवडणूक प्रतिष्ठेची करणारी ही निवडणूक आहे.

माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्याविरोधात माजी आमदार विवेक पाटील यांच्यातील या लढाईत पहिल्यांदा शेकापने प्रचाराचा व्याप वाढवला आहे. वेगवेगळी प्रचारतंत्रे वापरून पक्षाची प्रतिमा घरोघरी पोहोचविण्यासाठी शेकापने कंबर कसली आहे.

पनवेल नगर परिषदेवर रामशेठ ठाकूर आणि त्यांचा मुलगा प्रशांत ठाकूर यांची सत्ता होती. ही कशी कुचकामी आहे, शेकापने लोकांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न प्रचाराच्या माध्यमातून सुरू केला आहे. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात शेकापचा रोख भाजपवासी झालेल्या ठाकूर यांच्यावर आहे. शेकाप स्वत:ला पुरोगामी पक्ष समजतो. यासाठी त्यांनी सत्तालोलुप ठाकूर पितापुत्रांविरोधात फलकबाजी सुरू केली आहे. यासाठी शेकापने पुण्याहून काही तज्ज्ञ मंडळी आणून निवडणूक पूर्व अंदाज अजमावण्यासाठी सर्वेक्षण केले. याच सर्वेक्षणातील अहवालाप्रमाणे पनवेलच्या निवडणुका मे महिन्यात झाल्यास सत्ताधारी पक्षाच्या हातामधून सत्ता जाण्याचे संकेत मिळताच काहींनी पुन्हा प्रचारतंत्राचा मोठा वापर करून महापालिका क्षेत्रातील मतदार याद्यांमधील घोळ बाहेर काढून त्याची चर्चा घडवली. याद्यांचा घोळ प्रसिद्धीच्या माध्यमातून राज्यभर पसरविण्यात आल्याने मोठय़ा चर्चेमुळे काही दिवसांसाठी, का होईना राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक पुढे ढकलणे भाग पडले. राज्यात दोन वेळा मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची नामुष्की निवडणूक आयोगावर ओढवली.

भाजपच्या बडय़ा नेत्यांच्या डोळ्यांदेखत खारघरमध्ये ज्या कार्यकर्त्यांना निवडणुकीत धमकावण्याचा आणि मारहाणीचा प्रकार घडला. अशा कार्यकर्त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. येथील स्थानिकांच्या मते उमेदवारी मिळालेले उमेदवार हे ‘बाहेरवाले’ आहेत. पनवेल महानगरपालिकेचे पहिले आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची बदली ही भाजपनेच केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. पहिल्या निवडणुकीत आयुक्तांची बदली हा निवडणुकीचा विरोधकांनी मुद्दा लावून धरला आहे.

प्रचाराच्या रणधुमाळीत शेकापचे पाटील आणि भाजपचे ठाकूर यांनी स्वत:च्या मालकीच्या वृत्तपत्रांचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला आहे. निवडणुकीत भाजपविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन शेकाप उतरत आहे. भाजपला शिवसेना साथ देईल, असा विश्वास भाजपच्या ठाकूर यांना होता; मात्र युतीचे आमंत्रण देऊनही शिवसेनेने ती स्वीकारली नाही. यावरून सेनेत दोन गट पडले. युती झाल्यास जागेच्या वाटपावरून एकमत होणार नाही, असे एकूण चित्र होते. त्यामुळे युतीचा प्रस्ताव फेटाळण्याचाच निर्णय शिवसेनेच्या सर्वोच्च नेतृत्वाने घेतला.

केंद्रीय मंत्री अनंत गीते हे भाजपच्या रामशेठ ठाकूर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगतात तर दुसरीकडे उद्धवसाहेबांचा शब्द अखेरचा असे राज्य सचिव आदेश बांदेकर यांनी सांगितले. खासदार गीते यांच्यामागे कोणताही नेता भाजपसोबतच्या सकारात्मक चर्चेसाठी उभा राहिला नाही. खासदार संजय राऊत, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वबळाचीच भाषा केली.

२५ वर्षांनी पनवेलमध्ये सेना स्वबळावर लढत आहे. एकनाथ शिंदे यांच्या आदेशामुळे सैनिक कामाला लागले आहेत. उद्धवसाहेबांचे स्वप्न या निवडणुकीत पूर्ण करण्यासाठी सेना कामाला लागली आहे. यासाठी समाजमाध्यमांवरील प्रचारावर शिवसैनिकांचा जोर आहे. याशिवाय मनसेची ताकद पनवेल नगर परिषदेत शून्य होती. आता महानगरपालिका निवडणुकीतही मनसे उतरली आहे.

विविध वाहनांवरील डिजिटल स्क्रीनच्या मदतीने प्रचाराचा धडाका सुरू आहे. यासाठी काही मजूरही पक्षांनी कामाला लावले आहेत. यात काही पुरुष आणि महिला सकाळी व सायंकाळी पायी फिरून प्रचारकार्यात गुंतले आहेत. दिवसाकाठी त्यांना पाचशे रुपयांची बिदागी दिली जात आहे. रिक्षांच्या मागे बसतील अशा आकाराचे एलईडी स्क्रीन चौकाचौकांत उमेदवारांच्या प्रचारासाठी फिरत आहेत. प्रचारासाठी आणलेल्या कार्यकर्त्यांच्या सकाळच्या न्याहरीपासून ते रात्रीच्या जेवणापर्यंतची सोय पक्षांच्या वतीने करण्यात आली आहे. पालिका क्षेत्रातील बहुतेक मतदार सध्या गावी गेले आहेत. त्यामुळे अनेक उमेदवारांना चिंता लागून राहिली आहे. तरीही उपलब्ध मतदारांना स्वत:कडे खेचण्यासाठी प्रचाराचे नवनवे तंत्र अवलंबण्यात येत आहे.

दहा वर्षांत झपाटय़ाने वाढणारे शहर असा किताब मिळवणारे पनवेल परिसरातील पहिल्या महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. सध्या एक हजार कोटी रुपयांची उलाढाल असणाऱ्या ‘ड’ वर्गातील पनवेल महापालिकेची उलाढाल काही वर्षांतच दहा हजार कोटींवर जाणार असल्याचे सूतोवाच केले जात आहे. त्यामुळे पनवेल महानगरपालिकेची पहिली सत्ता मिळविण्यासाठी पक्षांनी प्रचाराची एकही संधी सोडलेली नाही.

First Published on May 16, 2017 2:39 am

Web Title: all political party ready for panvel municipal corporation election