महापालिका प्रशासनाकडून टाळेबंदीचे निर्बंध शिथिल; मॉल, शॉपिंग सेंटरला मात्र परवानगी नाही

नवी मुंबई : महापालिका क्षेत्रामध्ये दैनंदिन करोना रुग्णसंख्या पन्नास पर्यंत खाली आली असल्याने नवी मुंबई महापालिका प्रशासनाने मंगळवारपासून काही आस्थापना सुरू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार अत्यावश्यक सेवेसह इतर एकल दुकाने सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मॉल आणि शॉपिंग सेंटरमधील दुकानांना परवानगी देण्यात आलेली नाही.

गर्दी टाळण्यासाठी शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद राहणार आहेत. तसेच दुपारी २ वाजेनंतर नागरिकांना विनाकारण फिरण्यास बंदी आहे. या नियमांचा दुकानदारांनी भंग केला तर, करोना साथ संपेपर्यंत दुकाने बंद ठेवण्यात येतील. दरम्यान, सकाळी अथवा सायंकाळी फिरण्यास, धावण्यास, व्यायाम करण्यास परवानगी आहे किंवा नाही याबाबत नवी कोणतीही स्पष्टता नाही. यामुळे यापूर्वीचे नियम यासाठी लागू राहतील, अशी माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली. करोना चाचणीत दहा टक्के किंवा त्यापेक्षा कमी करोनाबाधितांचे प्रमाण तसेच प्राणवायूयुक्त खाटा ४० टक्क्यांपेक्षा कमी भरलेल्या असतील तर, निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार राज्य सरकारने महापालिकांना दिले आहेत. त्यानुसार नवी मुंबई महपालिका प्रशासनाने सोमवारी सायंकाळी नवी नियामवली जाहीर केली आहे.

दुपारी दोन वाजेनंतर वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगाव्यतिरिक्त ये-जा करण्यावर निर्बंध असणार आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार वस्तूंच्या घरपोच सेवेस परवानगी असणार आहे. करोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयाव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहणार आहेत. त्या ठिकाणी जास्तीच्या उपस्थितीची आवश्यकता असेल तर

त्यांना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. कृषीविषयक दुकाने आठवडय़ाच्या सर्व दिवशी म्हणजेच सोमवार ते रविवार सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे सुरू राहणार आहेत. दुकानांना पुरवठा केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध असणार नाहीत. परंतु ठरवून दिलेल्या वेळेनंतर दुकानदारांना ग्राहकांना वस्तू विक्री करता येणार नाहीत. तसेच यापूर्वी निश्चित केलेल्या वेळेनुसार घरपोच सेवा सुरूच राहणार आहे.

शहरात रुग्णसंख्या कमी होत असली तरी पुढील १५ दिवस निर्बंध कायम आहेत, मात्र ते अंशत: शिथिल करण्यात आले आहेत. शहरातील दुकाने ७ ते २ पर्यंत सुरू ठेवता येणार असून इतर दुकानेही सोमवार ते शुक्रवार सुरू राहतील. शनिवार व रविवारी फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू राहतील. चित्रपट, नाटय़गृह, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स मात्र बंद राहतील.

अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका  

उपाहारगृहांमध्ये खाण्यास बंदी कायम

नव्या आदेशात शहरातील उपाहारगृहांमध्ये पार्सल सुविधा ठेवण्यास परवानगी असणार आहे. पण उपाहारगृहांमध्ये खाद्यपदार्थ खाण्यास बंदी कायम असणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.