राज्यात शिवसेना-भाजप युतीचे बिगूल वाजल्याने नवी मुंबईतील अनेक भाजप प्रवेशासाठी उंबरठय़ावर उभे असलेल्या स्थानिक नेत्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले गेले आहे. लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुकीचे जागावाटप ठरल्याने विधानसभा उमेदवारीचे मनुसभे रचणाऱ्यांची निराशा झाली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी आता शिवसेनेचे विद्यमान खासदार कायम राहणार आहेत तर विधानसभेसाठी भाजप व शिवसेना यांना नवी मुंबईतील प्रत्येक एक जागा वाटय़ाला येणार आहे. यामुळे शिवसेनेचे विजय चौगुले, काही नगरसेवक आणि माथाडी नेते नरेंद्र पाटील यांचे विधानसभेत जाण्याचे स्वप्न भंगले आहे.

दोन दिवसांपूर्वी राज्यात शिवसेना-भाजप युती झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे युती होणार नाही म्हणून या दोन पक्षांतील इच्छुक उमेदवार कामाला लागले होते. पक्षानेही त्यांना तयारीला लागण्याचा सल्ला दिला होता. पालिकेचे विरोधी पक्षनते विजय चौगुले यांनी आपल्या वडार समाजाची बांधलेली मोट आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे केलेले कौतुक पाहता ते लोकसभा निवडणुकीअगोदर भाजपमध्ये प्रवेश करतील अशी अटकळ आहे. युती झाली नसती तर भाजपच्या उमेदवारासाठी केलेले प्रयत्न चौगुले यांच्या विधानसभा निवडणुसाठी गृहीत धरण्यात आले असते. त्याबदल्यात त्यांना ऐरोली विधानसभा निवडणुकीचे गाजर दाखविण्यात आले होते. शिवसेनेतून आता उमेदवारी मिळणार नाही असे वाटू लागल्याने चौगुले यांनी वेगळी वाट चोखाळण्याचा प्रयत्न केला आहे. युती झाल्याने ही गणिते आता कोलमडून गेली आहेत. चौगुले जर शिवसेनेचे उमेदवार राहणार नसल्यास पालिकेतील पाच वामनमूर्ती नगरसेवकांनी गळ टाकले होते. ऐरोली विधानसभेसाठी त्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. ते बांशिग आता शिवसेनेचे उमेदवार विजय नाहटा यांच्या कामी येणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या प्रेमात असलेले दुसरे नवी मुंबईकर माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी युती झाली नाही तर ऐरोली किंवा कराड तालुक्यातील एखादा मतदारसंघ शोधन ठेवला होता पण त्यांच्या इच्छांना मूठमाती मिळाली आहे. त्यामुळे भाजपने दिलेले आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदावरच त्यांची बोळवण होणार आहे.

धास्ती वाढली

युती होणार नाही असे गृहीत धरून कार्यकर्ते देखील तयारीला लागले होते, पण आता दोन्ही निवडणुकींना युती होणार असल्याने या पक्षातील कार्यकर्त्यांचा हुरूप आणि धास्ती वाढली आहे. या दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते एकमेकांना किती सहकार्य करतील याबाबत संशाकता आहे.