नवी मुंबईतील व्यापाऱ्यांची पालिकेकडे मागणी

नवी मुंबई : सम-विषम तारखेऐवजी सरसकट दुकाने सुरू करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी नवी मुंबईतील व्यापाऱ्यांनी केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही विनंती करण्यात आली आहे.

नवी मुंबईत सम-विषम तारखेला दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. ५ ऑगस्टपासून मॉल सुरू करण्यात येणार आहेत. याच वेळी दुकानदारांना सम-विषम तारखेच्या चक्रात अडकवू नका, असे व्यापाऱ्यांनी मागणीत म्हटले आहे. टाळेबंदीच्या नियमांचे नागरिकांकडून पालन केले जात आहे. दुकानदारांकडूनही अशा कोणत्याही नियमांची पायमल्ली केली जात नाही. जर करोनाच्या भीतीने व्यापाऱ्यांना दुकानांचे दरवाजेच उघडू नका, असे सांगितले जात असेल तर त्यांचे भविष्यात अधिकच नुकसान होण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. चिंचोळ्या रस्त्यांवरील दुकानांसाठी सम-विषम तारखेचा प्रयोग योग्य आहे; परंतु नवी मुंबईतील बहुतेक भागांतील रस्ते ३० मीटर रुंदीचे आहेत. अशा विस्तीर्ण परिसरात नागरिक अकारण गर्दी करतील, अशी स्थिती नाही. त्यामुळे सरसकट दुकाने उघडण्यास परवानगी दिल्यास व्यापाऱ्यांचे नुकसान टळेल, असे नवी मुंबई किरकोळ व्यापारी संघटनेने म्हटले आहे.

मॉलमध्ये गर्दी होणार असेल तर मग रस्त्यावरील गर्दी का नको, असा प्रश्न आपोआपच निर्माण होतो. याशिवाय किराणा मालाची दुकाने आणि औषधांची दुकाने सुरूच आहेत. तिथे करोनाच्या संसर्गाचे काय, असा सवाल नवी मुंबई किरकोळ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद जोशी यांनी केला.

छोटय़ा व्यापाऱ्यांना सरसकट दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात यावी. याबाबत पालिका आयुक्तांकडे मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही साकडे घालण्यात येईल, असे चेंबर ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रियल अँड ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष मोहन गुरनानी यांनी सांगितले.